जिंकणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी जिंकणारच : उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी महाराज

0
16

उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी महाराज यांनी प्रवचनातून दिला जीवन जगण्याचा मंत्र

नगर – वर्तमानात जगताना तसेच भविष्यातही प्रत्येकाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सामाजिक आयुष्यात अनेक समस्या असतात. त्यांचा यशस्वीपणे सामना करायचा तर मेडिटेशन आणि समर्पण भाव आवश्यक आहे. प्रत्येकाने मनात संकल्प केला पाहिजे की, जिंकणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी जिंकणारच, असे मार्गदर्शन उपाध्याय प्रवर, अर्हम विज्जा प्रणेता प्रविणऋषीजी महाराज यांनी केले. आनंदधामच्या पवित्र प्रांगणात गुरूवारी रात्री प्रविणऋषीजी महाराज यांचे ’आज और कलकी चुनौती’ या विषयावर प्रवचन झाले. त्यांच्यासमवेत तीर्थेशऋषीजी महाराज होते. प्रारंभी नरेंद्र फिरोदिया, सुनील मुनोत, सी.ए. अशोक पितळे यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी विलास कटारिया, संतोष शेटिया, सचिन देसर्डा, प्रविण कटारिया, सुनील बोरा आदी उपस्थित होते. प्रविणऋषीजी महाराज यांचे अनमोल विचार ऐकण्यासाठी जैन बंधू भगिनी, युवक, युवती, लहान मुले उपस्थित होते. प्रविणऋषीजी महाराज यांनी अनेक उदाहरणे देत प्रत्येकाला आव्हानांचा सामना करण्यासाठी विचार मंत्र दिला. ते म्हणाले की, जीवनात आव्हाने नसतील तर प्रगती होऊ शकत नाही. आव्हानांचा अर्थ आहे की जुने रस्ते सोडून नवीन रस्त्यावर मार्गक्रमण करणे. आताच्या काळात वैयक्तिक आयुष्यात सगळ्यांना असे वाटते की, मी सगळ्यांमध्ये आहे पण माझं कोणी नाही. व्यक्ती स्वतःला हतबल मानतो, नैराश्य येते. त्याला अपयशाची भीती वाटते. आपल्याकडे यशस्वी होण्यासाठी सगळं शिकवलं जाते. पण अपयश कसे पचवायचे, अपयशाचा सामना कसा करावा हे शिकवले जात नाही. त्यामुळेच भगवान महावीरांनी एखादे कार्य करताना त्यातील नकारात्मक बाबींचा आधी विचार करावा आणि नंतर चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे अशी शिकवण दिली.

आपल्या गुरूंवर, भगवंतावर श्रद्धा ठेवा. अंधारात तुमची सावली तुम्हाला सोडून जाईल त्यावेळी गुरू तुमच्या सोबत असेल. आपला जन्म जिंकण्यासाठी झालेला आहे, जिंकणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हे कायम मनात असू द्या. विश्वास आणि श्रद्धा महत्वपूर्ण आहे. प्रभू श्रीराम वनवासात होते तेव्हा त्यांसोबत लक्ष्मण होते. तिकडे अशोक वाटीकेत सीतामाई एकट्या होत्या. पण त्यांना विश्वास होता प्रभू श्रीराम आपली नक्की सुटका करतील. अशी श्रद्धा आपल्या भगवंताप्रती असली पाहिजे. कौटुंबिक स्वास्थ्याबाबत मार्गदर्शन करताना प्रविणऋषीजी महाराज यांनी सांगितले की, कुटुंबात प्रत्येकाला वाटते आपण सगळ्यांसाठी खूप मेहनत करतो पण आपली कदर होत नाही. खरे तर गाढव सर्वाधिक मेहनत करतं पण पूजा गायीची होते. स्वतःला गाढव नाही तर गाय समजा. कौटुंबिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी घरात कोणीही दुःखी झोपणार नाही याची काळजी घ्या. कारण घरात कोणीही दु:खी असेल तर सगळ्या घरावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. परिवारातील प्रत्येकाने एकमेकांना समजून घेतले पाहिजे, एकमेकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. सामाजिक जीवनातही अनेक प्रकारचे आव्हाने आहेत. विशेषतः जैन समाजासमोर तर मोठे प्रश्न आहेत. जैन म्हणून जैनांची वेगळी ओळख राहिलेली नाही. कारण आपल्याला स्वतःलाच जैन तत्वज्ञानाची पूर्ण माहिती नसते. यासाठी आधी जैनिझम काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. अर्हम विज्जा अभियान याचसाठी सुरू आहे. त्याचा भाग बनला. जैन म्हणून ओळख निर्माण झाल्यावर सामाजिक जीवनातील अनेक प्रश्नांची उकल होईल. आपल्या पुढच्या पिढींवर चांगले संस्कार होतील असे मौलिक विचार प्रविणऋषीजी महाराज यांनी मांडले. शेवटी मंगलपाठाने प्रवचनाची सांगता झाली. सूत्रसंचालन स्वप्ना कटारिया आणि माया धोका यांनी केले.