भारताचा नागरिक म्हणून अभिमानाने मतदानाचे पवित्र कार्य पार पाडावे :आयुक्त डॉ पंकज जावळे

0
43

महापालिकेच्यावतीने शहरात मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन

नगर – लोकशाहीमध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क दिलेला आहे. त्या माध्यमातून प्रत्येक भारतीय नागरिक आपला प्रतिनिधी सभागृहात पाठवत असतो. एवढी मोठी ताकद ही भारतीय नागरिकाच्या एका मतात आहे. प्रत्येक भारतीय नागरिकानी मतदानाचे पवित्र कार्य जबाबदारीने पार पाडावे असे प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मतदार जनजागृती अभियानास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, व महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. लोकशाही मजबूत व अबाधित राहण्यासाठी १०० टक्के मतदान होणे आवश्यक आहे. मात्र मतदार आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी पुढे येत नाहीत. संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार व त्याचे महत्त्व लक्षात घेऊन शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढे आले पाहिजे. समाजातील सर्व घटकांना मतदान करता यावे यासाठी शासन अनेक उपाययोजना, सुविधा देत असते. मात्र अनेक ठिकाणी ६० ते ७० टक्के मतदान होत असल्याचे चित्र आहे.

लोकशाहीच्या दृष्टीने ही बाब चिंतेची आहे असेही डॉ.जावळे यावेळी म्हणाले यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी,उपयुक्त विजयकुमार मुंडे, सहायक आयुक्त सपना वसावा, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, जल अभियंता परिमल निकम, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, नगर रचनाकार राम चारठणकर, सर्वेश चाफळे, शेळके, मुख्य लेखाधिकारी सचिन धस, मुख्य लेखापरीक्षक विशाल पवार, प्रसिद्धी अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी शशिकांत नजान, शहर अभियंता मनोज पारखे, अभियंता श्रीकांत निंबाळकर, गणेश गाडळकर, वैभव जोशी, प्रभाग अधिकारी अशोक साबळे, नानासाहेब गोसावी, संजय उमाप, राकेश कोतकर, अतिक्रमण विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ, संगणक विभाग प्रमुख अंबादास साळी, विद्युत विभाग जयेश कोके, किरण उजागरे, शेखर बनकर आदी उपस्थित होते.