जंगले नष्ट करुन वाढलेल्या शहरीकरणामुळे मानव आणि प्राण्यांमध्ये संघर्ष डॉ सुनिल तुंबारे

0
11

जागतिक पशुचिकित्सा दिनाचा जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय व जायंट्‌स ग्रुपचा संयुक्त उपक्रम

नगर – प्राण्यांपासून निर्माण झालेल्या बहुतांश गंभीर आजारावर उपाय नाही. जंगले नष्ट करुन वाढलेल्या शहरीकरणामुळे मानव आणि प्राण्यांमध्ये संघर्ष निर्माण होत आहे. जंगली प्राणी अन्न-पाण्यासाठी शहराकडे धाव घेत आहे. वन हेल्थ हा एक सर्वसमावेशक, एकात्मिक दृष्टीकोन असून, मानव, पाळीव आणि वन्य प्राणी, वनस्पती आणि व्यापक वातावरण यांचे आरोग्य जवळून जोडलेले आणि एकमेकांवर अवलंबून आहे. ही घडी विस्कटली जात असताना मानवाला यामध्ये पुढाकार घेऊन समतोल साधण्याची गरज निर्माण झाली असल्याचे डॉ. सुनिल तुंबारे यांनी सांगितले. जागतिक पशुचिकित्सा दिनानिमित्त शहरात जनावर व पशुंची निशुल्क तपासणी करुन त्यांना रोग प्रतिबंधक (अ‍ॅन्टी रेबीज), धनुर्वातचे लसीकरण करुन जंत प्रतिबंधक मोफत औषधे देण्यात आले. जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय व जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिराला शहरातील पशुपालकांचा सहभाग लाभला. जुने बस स्थानक जवळील जिल्हा पशु सर्व चिकित्सालय हॉस्पिटलमध्ये झालेल्या या शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनिल तुंबारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. मुकुंद राजळे, जायंट्स ग्रुपचे विशेष कमिटी सदस्य संजय गुगळे, फेडरेशन ऑफिसर विद्या तन्वर, सचिव नुतन गुगळे, अनिल गांधी, आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, अभय मुथा, अनिल गांधी, अमित मुथा, सुनिल खिस्ती, अमित मुनोत, दीपक मुथा, पशुविकास अधिकारी ज्ञानेश्वर काळे, डॉ. वसंत गारुडकर, डॉ. वर्षा साबळे, डॉ. शशीकांत कारखिले, डॉ. अनिल भगत, बाबासाहेब कडूस आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. मुकुंद राजळे म्हणाले की, प्राण्यांपासून विविध आजार पसरत असून, त्यामुळे पाळीव प्राण्यांची निगा राखणे वेळोवेळी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे प्रत्येक पशु पालकाचे कर्तव्य आहे.

पशु सेवा हे मोठे पुण्याचे काम असून, मागील ३० वर्षापासून जायंट्स ग्रुप पशु-प्राण्यांच्या सेवेसाठी शिबिराच्या माध्यमातून पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. संजय गुगळे म्हणाले की, पशुसेवा ही ईश्वरसेवाच आहे. मुया प्राण्यांना दया दाखविणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. पशुपक्षी आपल्या भावना त्यांच्या वेगळ्या भाषेतून व्यक्त करतात. त्यांचे दुःख वेदना समजून पशुचिकित्सक त्यांच्यावर सर्व प्रकारचे उपचार करत आहे. जायंट्स ग्रुपच्या वतीने राबविण्यात येणार्‍या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती देवून, सर्व जनावरांसाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे हे ३० वे वर्ष असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात नव्याने रुजू झालेले पशुधन विकास अधिकारी डॉ. शरद औताडे, डॉ. श्रीधर गडेवार, डॉ. स्नेहा जगदाळे, डॉ. शुभांगी व्यवहारे, डॉ. विद्या संकपाळ यांचा सत्कार करण्यात आला. या शिबिरात घोडे, कुत्रे, गाई, म्हशी, मांजर, शेळ्या आदी २२० पाळीव प्राण्यांची आरोग्य तपासणी करुन उपचार करण्यात आले. तसेच गरजेनुसार मोफत औषधही वितरीत करण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी इन्टासचे सचिन खेडकर, वेलकॉन निमल्सचे मंगेश पेन्शनवार, राकेश फार्मचे किशोर पाटील, इंडियन हर्बचे घोडके, शारदा एजन्सीचे दिनेश शिंदे, अजय मेडिकलचे दर्शन गुगळे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजकुमार चव्हाण यांनी केले. आभार डॉ. ज्ञानेश्वर काळे यांनी मानले.