मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
22

त्से त्से माशी म्हणजे काय?

तुम्ही म्हणाल काय बुवा हे नाव! त्से त्से माशी ही घरात नेहमी दिसणार्‍या माशीसारखीच एक प्रकारची माशी आहे. त्से त्से माशी व घरातील माशी यांच्यात बरेच साम्य आहे. त्से त्से माशी अर्धा इंच लांब असते व तिचा रंग पिवळसर किंवा गडद तपकिरी असतो. कात्रीच्या पात्यांसारखे पंख असलेल्या या माशीची सोंड खूप तीक्ष्ण व मजबूत असते. या सोंडेनेच ही माशी चावते व त्वचेला छिद्र पाडून रक्त प्राशन करते. आपल्या सुदैवाने ही खतरनाक माशी आफ्रिका खंडात आढळते. आपल्याकडे ती दिसून येत नाही. त्से त्से माशी सुमारे १०० दिवस जगते. ती अंडी न घालता सरळ अळ्यांनाच जन्म देते. त्से त्से माशी माणसांना, पक्ष्यांना किंवा प्राण्यांनाही चावतात. या माशा प्रामुख्याने दिवसाच चावे घेतात. या माशांमुळे ‘स्लिपींग सिकनेस’ या रोगाचा प्रसार होतो. ‘ट्रिपॅनोसोमा ब्रूसी’ नावाचे या रोगाचे जंतू त्से त्से माशीमुळे निरोगी माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. अशा व्यक्तीला सुरुवातीला ताप येतो. तापासोबत शरीरातील लसिकाग्रंथी मोठ्या होतात, सूजतात. कालांतराने मेंदूवर परिणाम होतो. हा रोग झालेली व्यक्ती अशक्त होत जाते व वर्ष-दीड वर्षात मरण पावते. या गंभीर रोगाचे त्यामुळेच दूरगामी, सामाजिक व आर्थिक परिणाम होतात. “नाकावरची माशी देखील उठत नाही” असे आपण गमतीने म्हणतो. पण जर देश आफ्रिकेतला असेल आणि माशी ‘त्से त्से’ असेल तर मात्र खैर नाही. कारण अशी माशी आपल्या प्राणावरच बेतू शकते. त्से त्से माशा राहतात ती झाडेझुडपे नष्ट करून व डी.डी.टी., डायएल्ड्रीनसारख्या कीटकनाशकांचा वापर करून या माशीचा बीमोड करता येतो.