टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजे काय?

0
42

 टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजे काय?

माणूस मेल्यानंतर त्याचे काय करायचे, हे त्याच्या धर्मानुसार वा मृत्यूपूर्वी त्याने काही इच्छा (उदा. देहदान) लिहून ठेवली असेल तर त्यावर ठरते. हिंदूंमध्ये मृतदेहाला अग्नी देतात. मुस्लीम आणि ख्रिश्चन लोक मात्र मृतदेह पुरतात. मृतदेहाला अग्नी देण्यासाठी पूर्वापार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे लाकडांचा वापर करून चिता तयार केली जाते. आजकाल विद्युतदाहिन्यांमध्येही मृतदेहाला अग्नी देतात. अर्थात ही सोय फक्त मोठ्या शहरांमध्येच उपलब्ध आहे. तुम्हाला वाटेल, ही काय भलतीच चर्चा सुरू केली आहे! पण ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ म्हणजे काय, हे सांगण्यासाठी ही पार्श्वभूमी आवश्यक आहे. पारशी लोक ‘टॉवर ऑफ सायलेन्स’मध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात किंवा मृतदेह ठेवतात. हा टॉवर एखाद्या टेकडीवर बांधलेला असतो. या टॉवरच्या तळाशी सुमारे ३०० फूट परिघाचा एक गोलाकार ओटा असतो. या ओट्याच्या मध्यभागी सुमारे १५० फूट परिघाची गोलाकार विहीर असते. गोलाकार ओट्यावर मृतदेह ठेवला जातो. १५ ते ३० मिनिटांत गिधाडे गोळा होऊन त्या मृतदेहावरचे सर्व मांस खाऊन त्याचे रूपांतर हाडांच्या सापळ्यात करतात. हवा व तापमान यांच्यामुळे हाडे वाळल्यावर ती ओट्याच्या आतील भागातील विहिरीत टाकली जातात. तेथे विघटन होऊन त्यांचा भुगा होतो. भिंतीमध्ये असलेल्या छिद्रांतून पावसाचे पाणी विहिरीत येते व हाडांचा भुगा या पाण्याबरोबर वाहून जातो व मातीत मिसळला जातो. अशा प्रकार मृतदेहाची चांगल्या रितीने विल्हेवाट लावली जाते. ही पद्धत कमी खर्चाची, कमी वेळ लागणारी आहेच; पण यात भुकेल्या गिधाडांना अन्नही मिळते. मृतदेह जाळल्यामुळे होणारा धूर, प्रदूषण हे त्रासही वाचतात. मुख्य म्हणजे मृत्यूबद्दलची अनावश्यक व लेषदायी भावनिकताही यात नसते.