सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवाराची हरकत

0
132

नगर – नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या डॉ.सुजय विखे यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी २ मुद्द्यांवर हरकत घेत विखे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याची मागणी निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या कडे केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (दि.२५) नगर दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी २७ उमेदवारांनी ३२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केलेले १६ उमेदवार अशा प्रकारे उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍या एकूण उमेदवारांची संख्या ४३ एवढी झाली आहे.

पदाचा दुरुपयोग करत लाभ मिळविल्याची केली तक्रार

या दाखल अर्जांची छाननी शुक्रवारी (दि.२६) सकाळी ११ वाजेपासून सुरु झाली. या छाननी दरम्यान डॉ.सुजय विखे यांच्या अर्जावर गिरीश जाधव यांनी २ मुद्द्यांवर हरकत घेतली. विखे यांनी पदाचा दुरुपयोग करत त्यांच्या विळद घाट येथील संस्थेकडे देय असलेली नगर महापालिकेची पाणीपट्टीची रक्कम माफ करून घेतली. तसेच त्यांच्या खाजगी संस्थेसाठी वन विभागाची सुमारे ५०० एकर जमीन बेकायदेशीर पणे संपादित करून घेतली असल्याने विखे यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा अशी मागणी गिरीश जाधव यांनी केली. या हरकतीवर जिल्हाधिकार्‍यांनी निर्णय राखीव ठेवला असून सायंकाळी ते निर्णय देणार आहेत. याबाबत आपण निवडणुक निरीक्षक यांची भेट घेवून तक्रार करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.