लहान मुले माती का खातात?
नवीनच रांगायला शिकणारी मुले जे दिसेल ते तोंडात घालतात. काही मुले माती खातात, पेन्सिल खातात. याचे कारण काय ते आता पाहू. आहारात लोह व कॅल्शियम या क्षारांची कमतरता असल्यास, मुलाला वरचे अन्न सुरू न केल्यास, अॅनेमिया वा रक्तक्षय (कोणत्याही कारणामुळे) असल्यास मुले माती खातात. काही मुलांमध्ये, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही ही भावना वाढीस लागल्यानेही ते माती, पेन्सिली वगैरे खाऊन सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधून घ्यायचा प्रयत्न करतात. कृमींची लागण झालेली मुलेही माती खातात. माती खाल्ल्याने कृमींची लागण होऊ शकते. मुलाला लोहक्षार जास्त प्रमाणात दिल्याने मुले माती खाणे बंद करतात. तसे न झाल्यास मानसिक कारणांचा शोध घ्यावा लागतो. माती खाणार्या मुलाच्या पाठीत धपाटा मारताना मातेने या कारणांकडे थोडे लक्ष दिल्यास त्याचे माती खाणे थांबू शकेल.