नगर शहरातील ‘तो’ बिबट्या अखेर गायके मळ्यात ‘पिंजऱ्यात’ अडकला

0
21

नगर – शहरातील गायके मळा परिसरात २ महिन्यांपासून वावर असलेला बिबट्या अखेर बुधवारी (दि.१७) पहाटे वनविभागाच्या पिंजर्‍यात अडकला. या बिबट्याने मागील काही दिवसात अनेक कुत्री आणि डुकरांचा फडशा पाडला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. सहाय्यक सहकारी वकील अ‍ॅड. पुष्पा अरुण गायके बाहेरगावाहून आपल्या घरी गायके मळ्यात परत असताना पहाटे तीन वाजता बिबट्या त्यांच्या गाडीसमोर प्रकाशात दिसला. त्यानंतर तो त्यांच्या पाठीमागच्या साईडने जाताना त्यांनी पाहिला. अत्यंत भेदरलेल्या अवस्थेतील कुटुंबाने याची माहिती परिसरातील वस्तीवरील लोकांना फोनद्वारे दिली त्यानंतर ऊसतोड कामगार व गणेश गायके, कृष्णा गायके, सखाहरी गायके, ऋषीकेश गायके शिवाजी गायके पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजर्‍यामध्ये जेरबंद झाल्याचे निदर्शनास आले ही खबर वार्‍यासारखी शहरांमध्ये पसरल्यानंतर बघ्यांनी मात्र या ठिकाणी तुफान गर्दी केली होती.

गेल्या दोन महिन्यापासून गायके मळ्यात अत्यंत भीतीचे आणि दहशतीचे वातावरण होते. हा बिबट्या जरी जेर बंद झाला असला तरी आणखीन एक मादी व तिची पिल्ले या भागात आजही निदर्शनास येत असल्याचे या परिसरातील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. जिल्हा वन अधिकारी सौ. माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली, रेंज फॉरेस्ट ऑफिसर सुरेश राठोड, वनपाल अशोक शर्माळे, वनरक्षक विजय चेमटे व इतर वन कर्मचारी, प्राणीमित्र हर्षद कटारिया, कृष्णा साळवे, सचिन क्षिरसागर, नितेश पटेल, चारूदत्त जगताप आदी उपस्थित होते. सकाळी ११ वाजता वन विभागाची गाडी आल्यानंतर जेरबंद बिबट्याला फॉरेस्ट व्हॅन मध्ये टाकून नेण्यात आले.