देव भेटण्याची गोष्ट नसून अनुभवाची गोष्ट आहे : इंदुरीकर महाराज

0
59

सावेडी महापौर उद्यान येथे श्री संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानच्या वतीने कीर्तन 

नगर – वारकरी संप्रदाय खूप महान असून त्याचा वारसा आपल्या सर्वांना पुढे घेऊन जायचं आहे. या माध्यमातून चांगल्या विचाराची देवाण-घेवाण होत असते. आजच्या युवा पिढीला संतांचे विचार प्रेरणादायी असून ते रुजविण्याचे काम कीर्तनाच्या माध्यमातून होत असते. देव भेटायची गोष्ट नसून ती अनुभवाची गोष्ट आहे. सध्याच्या कलियुगामध्ये ज्ञानाला किंमत नसून पैसा आणि सत्ता याला महत्त्व आहे. माणसाची उंची ज्ञानावर ठरवा, ज्ञान हे संतांच्या सेवेशिवाय मिळू शकत नाही. अहंकार बाजूला ठेवून समाजामध्ये चांगले काम उभे करा. समाजामध्ये असलेले अज्ञान नष्ट करण्यासाठी महापुरुष व संतांचे विचार अंगीकरावे ज्ञानेश्वरी ही विश्वाची आई आहे, असे प्रतिपादन ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांनी केले. सावेडी महापौर उद्यान येथे श्री संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान च्या वतीने समाज प्रबोधनकार ह. भ.प. इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन झाले. यावेळी खा.डॉ.सुजय विखे पाटील, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अभय आगरकर, हभप संदीप महाराज खोसे, शिवाजी चव्हाण, माजी सभागृह नेते रवींद्र बारस्कर, दिलीप भालसिंग, विलास ताठे, मनोज ताठे, मा.नगरसेविका वंदना ताठे, अनिल बोरुडे, पल्लवी जाधव आदि उपस्थित होते. धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज एकवटला जात असतो त्यातून संतांचे विचार जनतेपर्यंत पोहचविले जात असतात हभप इंदुरीकर महाराज यांच्या समाज प्रबोधन कीर्तनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती होत आहे. बाबासाहेब वाकळे व श्री संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानयांच्या माध्यमातून वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून समाजामध्ये अध्यात्मिकतेची गोडी निर्माण केली जात आहे, असे मत खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.