मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
25

कासव आणि ससा

एका रानात एक कासव आणि ससा राहत होते. ससा नेहमी कासवाची भेट होताच बढाया मारी. त्याच्यासमोर फुशारकी गाजवे. एकदा ससा असाच फुशारकी करीत कासवाला म्हणाला, “माझ्या चपळतेपुढे तू फारच क्षुद्र. माझ्याबरोबर चालण्याची, पळण्याची बरोबरी कोणीच करणार नाही.” तेव्हा कासव म्हणाले, “ससेभाऊ, तुझ्या चपळतेचा तुला एवढा गर्व असेल तर चल, माझ्याबरोबर धावण्याची पैज लाव. आपण दोघे एकाच वेळी निघून त्या डोंगरापर्यंत जाऊ. जर माझ्या आधी तू तेथे पोहोचलास, तर मी तुला बक्षीस देईन. जर मी तुझ्या आधी तेथे पोहोचलो, तर तू मला बक्षीस देशील. बोल, आहेस कबूल?” सशाने कासवाची अट मान्य केली. मग दोघेही एकाच वेळी तिथून निघाले; पण थोड्याच अवधीत ससा बराच पुढे निघून गेला. कासव आपले आपल्या गतीने वाट कापीत चालले होते. कासव खूपच मागे राहिलेले पाहून दमलेला ससा मनात म्हणाला, ‘अजून कासव खूपच मागे आहे. आपण आता धावून दमलो. थोडा वेळ या झाडाखाली विश्रांती घ्यावी आणि पुन्हा ताजेतवाने होऊन धावत सुटावे; म्हणजे कासवाच्या किती तरी आधी आपण डोंगरापर्यंत पोहोचू. समजा, एखादे वेळी कासव थोडे पुढे निघूनही गेेले, तरी त्याला गाठण्यास आपल्याला कष्ट पडणार नाहीत. चार उड्यांतच आपण त्याच्या पुढे जाऊ” असा विचार करीत ससा जवळच असलेल्या झाडाच्या गार सावलीत झोपला. थोड्याच वेळात तो घोरू लागला. इकडे कासव मंद गतीने चालत-चालत सशाच्याही पुढे निघून गेले आणि थोड्याच वेळात ते डोंगराच्या पायथ्याला पोहोचले, तरी ससा आपला झाडाच्या सावलीत झोपलेलाच. जेव्हा ससा जागा झाला, तेव्हा पाहतो, तर कासव पायथ्याला पोहोचलेले दिसले. तेव्हा त्याला आपलीच लाज वाटली. तात्पर्य ः तेज बुद्धी असून अंगी आळस असेल, तर त्या माणसाकडून फारसे कार्य होत नाही. परंतु बुद्धी मंद असूनही जो सतत उद्योगात मग्न असतो, त्याच्याकडून खूप काम केले जाते.