नगरमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न

0
19

नगर – एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणार्‍याला सुरक्षा रक्षकाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना गुरुवारी (दि.११) पहाटे ३.३० च्या सुमारास सर्जेपुरा रोड लालटाकी येथे घडली. गोविंद दंडपत (वय २५, रा. खडकपूर, पश्चिम बंगाल)असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत निलेश हरिभाऊ कार्ले (रा. कल्याण रोड) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लालटाकी येथे सर्जेपुरा रोडवर अमर हॉटेलच्या बिल्डींगमध्ये पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम आहे. आरोपी गोविंद दंडपत हा दारूच्या नशेत गुरुवारी (दि.११) पहाटे ३.३० च्या सुमारास त्या एटीएम सेंटर मध्ये घुसला व त्याने एटीएम मधील पैसे चोरण्याच्या उद्देशाने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र सुरक्षा रक्षकाच्या हे निदर्शनास आल्यावर त्याने आरोपीला पकडले. त्यानंतर तेथे नागरिक गोळा झाले. त्यातील एकाने तोफखाना पोलिसांना फोन करून माहिती दिली. ही माहिती मिळताच रात्र गस्त घालणारे पथक तात्काळ तेथे पोहोचले व त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. याबाबत निलेश हरिभाऊ कार्ले यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी गोविंद दंडपत याच्या विरोधात भा.दं.वि.कलम ३८०, ५११, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.