बालरंगभूमी परिषद जिल्हा शाखेच्यावतीने नगरमध्ये ‘हसत खेळत बालनाट्य’ शिबीर

0
31

नगर – बालरंगभूमी सक्षम व्हावी, लहान मुलांना नाट्य, नृत्य कलेचे शिक्षण मिळावे या हेतूने बालरंगभूमी परिषद, अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने १० दिवसांचे बालनाट्य शिबिर २० ते ३० एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती अध्यक्षा उर्मिला लोटके यांनी दिली आहे. बालरंगभूमी परिषदेच्या वतीने दरवर्षी नाट्य शिबीराचे आयोजन केले जाते. यात नामांकित प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. अनेक बालकलाकार या कार्यशाळेत सहभागी होतात. बालराज्यनाट्य स्पर्धा, शाळेतील स्नेहसंमेलन, विविध स्पर्धांमधे सहभाग घेताना बालकलावंतांना याचा फायदा होत असतो. या कार्यशाळेमुळे मुलांमधे सभाधिटपणा, वकृत्व, भाषा सुधारण्यास मदत होईल तसेच शिबीरात एकपात्री, नाट्यछटा, नाट्य वाचन याचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे. याबरोबरच नृत्य कलेविषयी दहा दिवस मार्गदर्शन केले जाईल व सर्व शिबीरार्थींचे नृत्य बसविण्यात येणार आहे.

तसेच समारोपाच्या वेळी शिबीरातील विद्यार्थींची नाटीका सादर होणार आहे. प्रशिक्षक म्हणून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे बाल कलाकारांना शिकविणारे प्रा. डॉ. अमजद सय्यद तसेच नाट्यपरिषद मध्यवर्ती मुंबई चे कोषाध्यक्ष सतीश लोटके, तसेच सिनेनाट्य अभिनेते देवीप्रसाद सोहनी, नगरचे दिग्दर्शक शैलेश देशमुख हे नाट्य विषयक मार्गदर्शन करणार आहेत तर सागर अलचेट्टी, मैथिली जोशी, भाग्यश्री दातखिळे हे नृत्य विषयक मार्गदर्शन करणार आहेत. वयोमर्यादा वय वर्षे ६ ते १५ पर्यंत असेल. तरी प्रशिक्षणार्थींनी यामध्ये सहभाग घ्यावा असे शाखेचे प्रमुख कार्यवाह प्रसाद भणगे यांच्यासह संस्थेचे कार्यकारिणी सदस्य यांनी आवाहन केले आहे. या शिबिरात सहभागी होणार्‍या बाल कलाकारांना नगर मध्ये होणार्‍या शंभराव्या नाट्य संमेलनामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. प्रवेशासाठी आणि अधिक माहितीसाठी ९८३४४५९०३८, ७७२००००८३५ किंवा ९४२०७४९४९७ या क्रमांकावर संपर्क साधावा.