नेत्र रुग्णांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे चष्मे व गॉगल्स अल्पदरात उपलब्ध
नगर – जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या नेत्रालय विभागात नेत्र रुग्णांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे चष्मे व गॉगल्स अल्पदरात उपलब्ध करुन देण्यासाठी गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर व्हिजीओ क्राफ्ट या दालनाचा शुभारंभ उद्योजक पेमराज बोथरा यांच्या हस्ते झाला. या दालनाच्या माध्यमातून नेत्र रुग्णांना अल्पदरात उच्च दर्जाचे चष्मे व गॉगल्स मिळणार असून, हे दालन ट्रस्टच्या माध्यमातून चालविण्यात येत आहे. तर यातून मिळणारे उत्पन्न देखील हॉस्पिटलमधील गरजू रुग्णांच्या उपचारासाठी वापरले जाणार आहे. नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया व डॉ. सुधाताई कांकरिया यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी उद्योजक संतोष बोथरा, कुंदन कांकरिया, मानकचंद कटारिया, सतीश लोढा, प्रकाश छल्लाणी, प्रशासकीय अधिकारी आनंद छाजेड, डॉ. संदीप राणे आदी उपस्थित होते. पेमराज बोथरा म्हणाले की, दीन-दुबळ्यांच्या जीवनात आनंदऋषीजी हॉस्पिटल आनंद व प्रकाश निर्माण करण्याचे कार्य करीत आहे. आनंदऋषीजी महाराजांच्या विचाराने सेवाभाव हे ध्येय समोर ठेऊन आदर्शऋषीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेवा सुरु आहे. नेत्रालय विभागाच्या माध्यमातून गावोगावी वाडी-वस्तीवर जावून दृष्टीदोष असलेल्यांना सेवा दिली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. प्रकाश कांकरिया म्हणाले की, गरजू रुग्णांना दर्जेदार सेवा मिळण्यासाठी नेत्रालयात गुणवत्तेवर भर देऊन उपचार केले जात आहे. या दालनात ब्रॅण्डेड ऑप्टिकल्सचा लाभ देखील सर्वसामान्यांना मिळणार आहे. जास्तीत जास्त गरजूंना चांगली दृष्टी मिळावी हाच, उद्दिष्ट ठेवून ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे सांगितले.
डॉ. सुधाताई कांकरिया म्हणाल्या की, सर्वांच्या निरोगी दृष्टीसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलची तपस्या सुरू असून, याचा लाभ सर्वसामान्यांना दिला जात आहे. जैन सोशल फेडरेशनचे सर्व सहकारी या सेवा कार्यात योगदान देत असून, लाखो रुग्णांना नवदृष्टी देण्याचे काम करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. आनंद छाजेड म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या नेत्रालय विभागाची २०१७ मध्ये मुहुर्तमेढ रोवण्यात आली. या विभागाद्वारे ७५ हजार पेक्षा जास्त नेत्राच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ५ लाख नेत्रदोष असलेल्यांची तपासणी करुन त्यांना नवदृष्टी देण्याचे काम करण्यात आले. या विभागात नव्याने सुरु झालेल्या व्हिजीओ क्राफ्ट दालनात ब्रॅण्डेड चष्मे, विविध आकर्षक फ्रेम अल्पदरात मिळणार आहे. उन्हाळ्यानिमित्त चष्म्यावर सन गॉगल्स मोफत देण्यात येणार असून, नवीन दालनात सर्व चष्मे व गॉगल्सवर ३० टक्के सुट देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन हॉस्पिटलच्यावतीने करण्यात आले आहे. उपस्थितांचे आभार कुंदन कांकरिया यांनी मानले.