मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
19

काही जण रंगाने गोरे, तर काही जण काळे का असतात?

माणसाच्या रंगावर काही अवलंबून नसते. हे खरे असले, तरी काळ्या रंगाच्या लोकांना गोर्‍या व्यक्ती सुंदर वाटत असतात; तर गोर्‍या व्यक्तींना काळे लोक तरतरीत, स्मार्ट वाटत असतात. एकूण काय स्वतःजवळ जे आहे, त्यापेक्षा दुसर्‍याकडचे जास्त आवडणे हा माणसाचा स्वभाव आहे. पण काहीजण गोरे का असतात आणि काही जण काळे का असतात, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. विशेषतः एकाच आईच्या पोटी जन्म घेणार्‍या दोन मुलांचे रंगही वेगळे असतात, हे तुम्ही पाहिलेच असेल. असे का? ते आता समजून घेऊ. त्वचेची रचना दोन थरांमध्ये असते. यातला वरचा किंवा बाहेरचा थर (बाह्यत्वचा) पेशींच्या पाच थरांनी बनलेला असतो. यापैकी सर्वात खालच्या पेशीथरातून पेशी सतत निर्माण होत असतात व त्या हळूहळू वर सरकतात. या बाह्यत्वचेमध्ये रक्तपुरवठा किंवा मज्जातंतू नसतात. पोषण आणि संवेदना या दोन्हींसाठी त्याला खालच्या थरावर अवलंबून राहावे लागते. बाह्यत्वचेच्या पेशीथरांमध्ये मेलॅनीन नावाचे रंगद्रव्य असते. मेलॅनोसाईट नावाच्या पेशीपासून संप्रेरकाच्या नियंत्रणाखाली या द्रव्याची निर्मिती होत असते. मेलॅनिनचे प्रमाण हे आनुवंशिकता, वातावरण, स्त्री-पुरुष भेद, वय इ. विविध गोष्टींवर अवलंबून असते. आणि या रंगद्रव्याच्या प्रमाणावरूनच त्वचेचा काळे-गोरेपणा ठरतो. त्यामुळे निग्रोंची मुले सामान्यतः काळ्या रंगाची असतात. उन्हात काम करणारे लोक काळवंडतात, तर शरीराच्या ज्या भागाला ऊन लागत नाही तो भाग इतर भागांपेक्षा उजळ दिसतो. लहान मुले वयस्करांपेक्षा जास्त गोरी दिसतात. “आमचा राहुल लहानपणी फारच गोरापान होता हो, आताच काळवंडलाय…” असं तुमची आई म्हणते ते खरेच असते! अर्थात त्वचेचा रंग मुख्यत्वे मेलॅनीनमुळे ठरत असला, तरीही इतर दोन रंगद्रव्येही यासाठी महत्त्वाची असतात. एक म्हणजे त्वचेखालच्या चरबीतले पिवळे द्रव्य- कॅरोटीन आणि दुसरे म्हणजे त्वचेच्या रक्तप्रवाहातील हिमोग्लोबीन हे रक्तद्रव्य. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की, आपला रंग मेलॅनीन, कॅरोटीन व हिमोग्लोबीन या तीन द्रव्यांवरून ठरतो.