नगर – वैदुवाडी परिसरात गांजाची विक्री करणार्या व्यक्तीला तोफखाना पोलिसांनी पकडले. मच्छिंद्र सिताराम शिंदे (वय ५९ रा. सुरेश किराणा स्टोअर्सच्या शेजारी, वैदुवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ४० हजार रूपये किमतीचा दोन किलो ४६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार शिरीष तरटे यांच्या फिर्यादीवरून शिंदे विरोधात एनडीपीएस कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैदुवाडी येथील भोलेश्वर टि सेंटरच्या आडोशाला एक व्यक्ती गांजाची विक्री करत असल्याची माहिती शनिवारी (दि. ६) सायंकाळी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली. त्यांनी सदरची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपअधीक्षक अमोल भारती यांना कळविली. उपअधीक्षक भारती यांनी कारवाई करण्याबाबत आदेश दिले. निरीक्षक कोकरे यांनी नायब तहसीलदार तोरमल, उपनिरीक्षक शैलेश पाटील, अंमलदार दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, अहमद इनामदार, दिनेश मोरे, भानुदास खेडकर, वसिम पठाण, संदीप धामणे, तरटे यांच्यासह पंच, वजनकाटा धारक व्यक्ती, फोटोग्राफर यांना सोबत घेऊन रात्री पावणे नऊ वाजता वैदुवाडी परिसरात भोलेश्वर टि सेंटरवर छापा टाकला. पंचासमक्ष झडती घेतली असता तेथे गांजा मिळून आला. सदर गांजा बाबत चौकशी केली असता सुलतान राजु शेख (रा. नागापुर) याच्याकडून गांजा घेतला असल्याचे मच्छिंद्र शिंदे याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी गांजा जप्त केला असून शिंदे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.