अपघात का होतात?
दुसर्यांनी अपघात केला की ‘फार जोरात
गाडी चालवतो’, ‘लक्षच नसतं समोर’, ‘ओव्हरटेक
करत असेल’, ‘तिघांना घेऊन लूना चालवावीच
कशाला?’ ‘लायसेन्स कसे काय मिळाले कोणाला
माहीत’ असे अनेक उद्गार ऐकायला मिळतात.
दुसरीकडे ‘रस्त्यावर चिखल होता’, ‘स्पीड ब्रेकर
आहे, पण त्याबद्दल सूचनाच नाही’, ‘केवढे खड्डे
आहेत रस्त्यावर’, ‘बाजूला चालणारा माणूस
एकदम मध्ये आला’ यातील एखादे स्पष्टीकरण दिले
जात असते. यावरून अपघात का होतात, याचा
थोडा अंदाज आपल्याला येतो. गाडी चालवणारा,
वाहने व रस्ते या तिन्हींमुळे अपघात होऊ शकतात.
खूप वेगात गाडी चालवणे, ओव्हरटेक करणे, खूप
ताणतणाव, अतिश्रम, जागरण, मद्यपान व इतर
व्यसने, गाडीचे ब्रेक नीट नसणे, गाडीची देखभाल
व्यवस्थित न करणे, तांत्रिक अडचणी निर्माण होणे,
रस्ता खराब असणे, पुरेसा उजेड नसणे, हवामान
चांगले नसणे, खूप पाऊस, वावटळ, रस्त्यावर खड्डे
असणे, स्पीड ब्रेकर अयोग्य जागी असणे, रस्त्यावर
प्राणी असणे, एकाच रस्त्यावर पादचारी, हातगाड्या,
बैलगाड्या, ट्राम, बस, ट्रक अशी सर्वच प्रकारची
वाहतूक असणे; अशा अनेक कारणांमुळे अपघात
होतात. मद्यपान हे अपघातामागील महत्त्वाचे कारण
आहे. रस्त्यावरील अपघातांपैकी ३० ते ५०%
अपघातांचे कारण मद्यपान हेच असते. काही
जणांमध्ये अपघात होण्याची शयता इतरांहून
जास्त असते. धांदरटपणा, वेगाची आवड व दुसर्या
वाहनाला पुढे जाऊ न देण्याची वृत्ती; यामुळंही
अपघात होतात.
भारतात दरवर्षी ६०,००० लोक रस्त्यावर
होणार्या अपघातात मरण पावतात.
“टाळता येत नाही तो अपघात” वा
“देवाच्या इच्छेपुढे कोणाचे काय चालणार” अशा
विचारांमुळे ‘अपघात टाळता येतात’ या सत्याकडे
अक्षम्य दुर्लक्ष होऊ शकते. उपरोक्त सर्व कारणांबाबत
योग्य ती काळजी घेतल्यास अपघातांचे प्रमाण
बरेचसे कमी करता येईल. योग्य ती काळजी घेऊन
काम केल्यास घरगुती अपघात व उद्योगधंद्याच्या
ठिकाणातील अपघातही कमी करता येतील.