मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
19

डांग्या खोकला म्हणजे काय?
डांग्या खोकला हा जिवाणूंमुळे होणारा
श्वसनसंस्थेचा रोग आहे. या रोगाला इंग्रजीत हूपींग
कफ, मराठीत माकड खोकला, तर कोकणात
कोल्हेढास असे म्हणतात. वेळूच्या गाठीस डांग
म्हणतात. ती पाण्यात उगाळून पाजली असता हा
खोकला जातो, असा आयुर्वेदिक ग्रंथात उल्लेख
आहे. म्हणून या रोगाला डांग्या खोकला असे
म्हणतात. हा रोग सामान्यतः ५ वर्षांखालील
मुलांनाच होतो. श्वासावाटे हा रोग एकापासून
दुसर्‍याला पसरतो. या आजारात जिवाणूंमुळे
श्वसनसंस्था, फुफ्फुसे यांचा दाह होऊन खोकला
येत राहतो. एकदा खोकला सुरू झाला की त्याची
उबळ १०-१५ मिनिटांपर्यंत टिकून राहते. कित्येक
वेळा मुलाचा श्वास कोंडतो व मूल काळेनिळे पडते.
उबळीमध्ये उलटीही होऊ शकते. श्वास कोंडल्याने
मुल दगावू शकते. जोरजोराने खोकल्याने निर्माण
झालेल्या दाबाने डोळ्यात वा मेंदूतही रक्तस्राव होऊ
शकतो. या रोगाची गुंतागुंत म्हणून न्यूमोनिया,
श्वासनलिकादाह, कान फुटणे, मेंदूवर विपरीत
परिणाम आदी गोष्टी होऊ शकतात. यामुळे मूल
मृत्यूमुखी पडते.
डांग्या खोकला हा एरिथ्रोमायसीन किंवा
टेट्रासायलीनच्या औषधाने बराच कमी होतो.
खोकला कमी होण्यासाठी कोडेनचा वापर करता
येतो. पण एकदा रोग झाला की, औषधोपचारांचा
फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे रोग होऊ न
देणेच चांगले.
डांग्या खोकल्याचा आता सहजगत्या प्रतिबंध
करता येतो. यासाठी लहान मुलांना वयाच्या दीड,
अडीच व साडेतीन महिने वयात त्रिगुणी लसीचे
तीन डोस द्यावेत. त्यानंतर एक वर्षाने बूस्टर डोस
द्यावा. असे केल्यास हा रोग मुलांना होत नाही.
गेल्या काही वर्षात लसीकरणाचे प्रमाण वाढल्याने
या रोगाचे रुग्ण क्वचितच दवाखान्यात सापडतात.
या प्रभावी लसीचा वापर वाढल्यास हा रोग
कायमचा हद्दपार होऊ शकतो.