नगर – निसर्गभ्रमंती ग्रुपतर्फे वन्यजीवांची लोकसहभागातून तहान भागवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. नगर लगतच्या जंगल परिसरातील पाणवठ्यांची दुरुस्ती व त्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा करत आहेत. यावर्षी गुंडेगाव येथील वन विभागातील पाणवठे दुरुस्त करून टँकरने भरण्यात येऊन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली, असे निसर्ग भ्रमंतीचे विद्यासागर पेटकर यांनी सांगितले. सध्या कडक उन्हाळ्याचे चटके जाणवायला लागले आहेत त्यातून येणारा उन्हाळा खूपच तीव्र असल्याचे संकेतही आहेत, मागील वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प होते, वन्यजीव व पशुपक्षी जेथून आपली तहान भागवतात असे नद्या, नाले, नैसर्गिक व वन विभागाने तयार केलेले पाणवठे सध्या कोरडे पडले आहेत. त्यामुळे वन्यजीवांचे पाण्यासाठी हाल होत असून पाण्यासाठी ते नागरी वस्ती जवळ येत आहेत किंवा पाण्याअभावी तडफडून मृत्यू होणे असे प्रकार होतात. यासाठी नगरमध्ये निसर्गभ्रमंती ग्रुप हा पर्यावरण रक्षणासाठी काम करत आहेत.
जंगलातील पशु-पक्ष्यांची तहान भागावी यासाठी गेल्या नऊ वर्षापासून नैसर्गिक व कृत्रिम पानवठ्यावर टँकरने पाणी टाकण्यात येते. यासाठी निसर्ग भ्रमंती ग्रुप नगरच्या आसपासच्या जंगलात सर्वेक्षण करतात व आवश्यकते नुसार तेथे पाणी टाकले जाते. काही कृत्रिम पानवठे भेगाळलेले आढळल्यास अशा पाणवठ्याच्या दुरुस्तीचे कामही निसर्गभ्रमंती ग्रुपने हाती घेतले आहे. यासाठी नगरकर वाढदिवस, स्मृतीदिन तसेच मुया प्राण्यांच्या प्रेमापोटी सहभाग घेतात. या उपक्रमात यावेळी निसर्गभ्रमंतीचे प्रसाद खटावकर, नितीन केदारी, शशिकांत महाजन, दिनेश राऊत, संजय दळवी, सुरेंद्र सोनवणे, धीरज खिस्ती, नरेंद्र सोनवणे, वन विभागाचे वनपाल शैलेश बदडे, वनरक्षक मानसिंग इंगळे, वनकर्मचारी राम भोसले, कचरु भापकर, शेळके हे कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमासाठी उपवनसंरक्षक सौ.सुवर्णा माने यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे. अधिक माहितीसाठी व सहभागासाठी यांच्या विद्यासागर पेटकर मो.क्र.९४२२७३८६५४ यांच्याशी संपर्क साधावा.