निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात दारुसह ११.३७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

0
32

१०० आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नगर – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी जिल्ह्यात अवैध दारू धंद्यांच्या विरुद्ध जोरदार कारवाईची मोहीम सुरु केली असून ४ दिवसांत जिल्ह्यात ९५ ठिकाणी छापे टाकून १०० आरोपींना पकडले आहे. त्यांच्या कडून सुमारे ११ लाख ३७ हजार ९६१ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांना जिल्ह्यामध्ये हॉटेलवर विनापरवाना बेकायदा दारु विक्री करणारांच्या विरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार पो.नि. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची विविध पथके तयार करुन जिल्ह्यामध्ये हॉटेलवर विनापरवाना बेकायदा दारु विक्री करणारे व वाहतुक करणार्‍या इसम ांची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी दि.३० मार्च ते २ एप्रिल या कालावधीमध्ये एकुण ९५ गुन्हे दाखल करुन १०० आरोपींचे ताब्यातुन ११ लाख ३७ हजार ९६१ रुपये किमतीची देशी विदेशी व गावठी हातभट्टीची दारु व एक स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी या पूर्वी ही मागील आठवड्यात २६ ते २९ मार्च या कालावधीत जिल्ह्यात अवैध दारु व जुगार अशा अवैध धंद्यांची माहिती घेवुन एकुण ६६ गुन्हे दाखल करुन १२ लाख ६० हजार ३५० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन ७८ आरोपी विरुध्द कारवाई केलेली आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्फत यापुढे देखील अवैध धंद्याविरुध्द कारवाई सुरु ठेवणार असल्याचे पो. नि. आहेर यांनी सांगितले.