लोकसभा निवडणुकी संदर्भात शहर काँग्रेसची बुधवारी बैठक

0
27

नगर – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निलेश लंके यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून मोहटा देवी येथून प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण काळे यांनी कार्यकर्त्यांसह पाथर्डी शहरात त्यांचे स्वागत केले. बुधवारी सायंकाळी ७ वाजता अहमदनगर शहर काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावण्यात आली आहे. नगर शहरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके विविध भागांमध्ये भेटीगाठी देताना पहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते लंके यांच्या समवेत सक्रिय झाले आहेत. काँग्रेसचा गोटात शांतता पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहर काँग्रेसच्या बैठकीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

अधिक माहिती देताना दशरथ शिंदे म्हणाले की, आ. बाळासाहेब थोरात आणि किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये काँग्रेस भक्कमपणे काम करते आहे. शहरातील दहशत आणि शहराचा विकास या मुद्यांवरती निर्भीडपणे जनहितासाठी आवाज उठवत आहे. लोकसभा निवडणूक ही देशासाठी महत्त्वाची आहे. संविधान धोयात आले आहे. अशा वेळी हुकूमशाहीचा पराभव करणे गरजेचे आहे. बैठकीत प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेतले जाणार असून त्यानंतर पुढील रणनीती निश्चित केली जाणार असल्याचे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे.