कायनेटिक चौक बनलाय वाहतूक कोंडी अन्‌ ‘अपघातांचा हॉटस्पॉट’

0
55

जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचा झाला अपघातात मृत्यू; उपाययोजना करण्याची गरज

नगर – तीन महामार्ग एकत्र येणारा आणि नगर शहराचे प्रवेशद्वार समजला जाणारा कायनेटिक चौक गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडी अन अपघातांचा हॉटस्पॉट बनला असून या चौकात सातत्याने छोटे मोठे अपघात होत आहेत. रविवारी (दि.१७) सकाळीही एका जिल्हा परिषद कर्मचार्‍याचा या ठिकाणी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषदेचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) सुभाष दळवी यांचे मोटारसायकलला नगर पुणे रोडवर कानेटिक चौकात रविवारी सकाळी ११ च्या सुमारास टेम्पोने धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. काही नागरिकांनी त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र त्यांचे निधन झाले. त्यांचे मूळ गाव तिखी (ता. कर्जत) असून सध्या ते नगर कल्याण रोडवर राहत होते. त्यांच्यामागे आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचार्‍यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. कायनेटिक चौकात पुण्याकडून तसेच दौंडकडून येणारी वाहने एकत्र येतात या शिवाय नगर मधून पुणे व दौंड कडे जाणारी वाहनेही एकत्र येतात. या ठिकाणी वाहतूक सिग्नल आहेत. परंतु शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी कधी असतात तर कधी नसतात. त्यामुळे वाहतुकीला कुठलीही शिस्त राहिलेली नाही. अनेक अवजड वाहने आडवी तिडवी घुसून चौक ओलांडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे सायंकाळच्या वेळी तर हा चौक ओलांडून जाण्यासाठी वाहनचालकांना अर्ध्या तासापेक्षाही जास्त वेळ लागतो. तसेच या वाहतूक कोंडी मुळे सातत्याने छोटे मोठे अपघात होतात. या चौकात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच शहर वाहतूक शाखा यांनी संयुक्त पणे पुरेशा उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

महामार्गावरील अतिक्रमणांकडे महानगरपालिकेचे होतेयं दुर्लक्ष

शहरातून जाणारे महामार्ग प्रशस्त होत आहेत. शहरातील अंतर्गत रस्तेही प्रशस्त होत आहेत. या साठी केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधीही मिळत आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, अपघात टाळता यावेत या साठी रस्ते प्रशस्त होत असताना दुसरी कडे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहेत. त्यामुळे रस्ते प्रशस्त होवूनही वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या सुटत नाही. या समस्येला रस्त्यांवरील अतिक्रमणेच कारणीभूत आहेत. मात्र ही अतिक्रमणे काढण्याकडे महापालिका प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग यांचे दुर्लक्ष होत आहे. ही अतिक्रमणे हटवून या रस्त्यांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्याची आवश्यकता आहे.