केडगाव लिंक रोड परिसरात पुन्हा दिसला बिबट्या; मातीत आढळले पावलांचे ठसे; वन विभागाचे दुर्लक्ष

0
56

नगर – केडगाव परिसरात असलेल्या लिंक रोडवर गायके मळ्याजवळ मंगळवारी (दि.१२) रात्री ८.१५ च्या सुमारास एका दुचाकीस्वाराला पुन्हा एक बिबट्या दिसला आहे. तो मोटारसायकल स्वारासमोर रस्ता ओलांडून गेला असून, रस्त्याच्या खाली असलेल्या मातीत बिबट्याच्या पायाचे ठसेही आढळून आले आहेत. बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे केडगाव परिसरातील भीतीचे वातावरण अद्यापही कायम आहे. मात्र याचे वन विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना कुठलेही गांभीर्य वाटत नसल्याचे दिसत आहे. एखाद्या नागरिकावर बिबट्याने हल्ला करण्याची वाट वन विभाग पाहत आहे काय? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. केडगाव परिसर व केडगाव-निंबळक बायपास रोडवर तसेच लिंक रोडवर बिबट्याची दहशत काही संपत नाही. मागील आठवड्यात सायंकाळच्या सुमारास बायपास रोडवर नव्याने होत असलेल्या टोल नायाजवळ दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याने स्थानिक लोक हादरले आहेत. मागील २०-२२ दिवसांपासून केडगाव परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे.

२० दिवसांपूर्वी अंबिकानगर परिसरातून बिबट्याला मोठ्या महतप्रयासानंतर ताब्यात घेताना वनविभागाची दमछाक झाली होती. त्यानंतर मागील आठवड्यात रात्रीच्या सुमारास केडगाव निंबळक बायपास रोडवरील नेप्ती उपबाजार समिती जवळील उड्डाणपूल ते नव्याने झालेल्या टोलनाका परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यांनतर दुसर्‍या दिवशी सकाळी भूषणनगर, लिंक रोड परिसरातील गायके मळ्यातील विहीरीत मृत अवस्थेत बिबट्या आढळला होता. त्यानंतर पुन्हा नव्याने याच परिसरात दोन बिबटे दिसल्यामुळे या परिसरातील रहिवासी पुरते हादरले आहेत. अनेकांनी सकाळी व सायंकाळी व्यायामाला, वॉकिंगला जायचेही बंद केले आहे. बिबट्याची ही दहशत कायम असताना मंगळवारी (दि.१२) रात्री ८.१५ च्या सुमारास लिंक रोडवर गायके मळ्याजवळ मोटारसायकलवर चाललेल्या एका नागरिकाला मोटारसायकलच्या उजेडात एक बिबट्या रस्त्याच्या कडेला उभा असलेला दिसला. त्याने मोठ्याने हॉर्न वाजवल्यावर तो बिबट्या त्याच्यासमोर रस्ता ओलांडून पलीकडे असलेल्या उसाच्या शेतात गेल्याचे त्याने पाहिले. त्यानंतर त्याने परिसरातील नागरिकांना ही माहिती दिल्यावर नागरिक तेथे जमा झाले. त्यांनी बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडला नाही, मात्र रस्त्यापासून शेतापर्यंत असलेल्या मातीत बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले आहेत. वन विभागाच्या पिंजर्‍याला बिबट्याची हुलकावणी बायपास रस्त्यावर नवीन टोल नायाजवळ मागील आठवड्यात सायंकाळच्या वेळी २ बिबटे दिसले होते.

याबाबत नागरिकांनी वन विभागाशी वारंवार संपर्क केल्यावर पवार वस्ती परिसरात वन विभागाने ६ मार्च रोजी सकाळी पिंजरा लावला आहे. मात्र बिबट्याने वन विभागाच्या या पिंजर्‍याला हुलकावणी दिली आहे. इतकेच नव्हे तर बिबट्या आता बायपास ऐवजी लिंक रोड परिसरात दिसला असल्याने या भागातही पिंजरा लावण्याची गरज आहे. पालकमंत्री विखे यांनी वनविभागाकडे लक्ष द्यावे केडगाव परिसरातील नागरिक गेल्या २०-२२ दिवसांपासून बिबट्याच्या भीतीने दहशती खाली आहेत. मात्र वन विभागाला याचे कुठलेही गांभीर्य वाटत नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. पवार वस्ती परिसरात वन विभागाने ६ मार्च रोजी सकाळी पिंजरा लावला पण त्यानंतर परत वन विभागाचे कोणीही तिकडे फिरकलेले नाही. तसेच नागरिकांचे, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांचे फोनही कोणताच अधिकारी, कर्मचारी उचलत नसल्याने वनविभागाच्या या बेजबाबदारपणाबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वनविभागाने नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या मनातील भीती दूर करणे, अचानक बिबट्या दिसला तर काय उपाययोजना कराव्यात, याची माहिती देणे अपेक्षित आहे. मात्र हा संवाद तर दूरच अधिकारी, कर्मचारी फोनही उचलत नसल्याने या मुजोर अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष देण्याची गरज आहे.