नगर दक्षिण लोकसभेच्या मैदानात भाजपचा की राष्ट्रवादीचा उमेदवार?

0
39

महायुतीच्या जागावाटपात अजित पवारांचा जागेवर दावा, उमेदवारी कापण्याची परंपरा भाजप यावेळी राखणार का? राजकीय संभ्रम कायम

नगर – लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही प्रतिस्पर्धी आघाड्यांच्या स्तरावर सुरू असलेले चर्चेचे गुर्‍हाळ अद्याप संपलेले नाही. त्यामुळे नगर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात अद्यापही संभ्रमाचे वातावरण कायम आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा आतापर्यंत महायुतीतील प्रमुख घटकपक्ष असणार्‍या भाजपकडेच राहिला आहे. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षही महायुतीत सहभागी झाल्याने या पक्षानेही या जागेवर दावा केला आहे. मागील काही निवडणुकांचा मागोवा घेता या मतदारसंघात भाजप विरोधात राष्ट्रवादी अशीच लढत झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीचीही मोठी ताकद असल्याचा दावा या पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांसह वरिष्ठांकडून केला जात आहे. परंतु या मतदारसंघात भाजपचा विद्यमान खासदार असून, पक्षाचा दबदबाही कायम असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाने महायुतीतील घटक पक्षांच्या वरिष्ठांची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा आहे. मात्र या मतदारसंघात महायुतीकडून भाजपचा उमेदवार रिंगणात उतरणार की राष्ट्रवादी काँग्रेसचा हे येत्या एक-दोन दिवसात स्पष्ट होईल.

नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीलाच मिळणार?

महायुतीतील घटक पक्षांच्या जागावाटपात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळणार असल्याचा दावा या पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी केला आहे. आपल्या मोबाईलवर व्हॉटस्अ‍ॅप स्टेटस ठेवत गायकवाड यांनी याबाबतची माहिती मुंबई येथील पत्रकार परिषदेत दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या स्टेटसवरील माहितीनुसार नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळण्याची शयता निर्माण झाली असून, त्याबाबतचा अहवाल दिल्ली येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे, अशी माहिती गायकवाड यांनी दिल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

आ. निलेश लंकेंना थांबविण्यासाठी ‘नगर दक्षिण’वर राष्ट्रवादीचा दावा?

नगर दक्षिण मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून आ. निलेश लंके उमेदवारी करणार असल्याची चर्चा होत आहे. त्यांच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीचे नेते आणि प्रामुख्याने शरद पवार यांनी त्यांना आग्रह केल्याचे बोलले जात आहे. आ. लंके हे आजपर्यंत तरी अजित पवार यांच्याबरोबर आहेत, असे सांगितले जात आहे. मात्र ते कोणत्याही क्षणी शरद पवार यांच्याबरोबर जाऊन नगर दक्षिणेतून ‘तुतारी’ फुंकण्याच्या तयारीत असल्याचे त्यांचेच कार्यकर्ते सांगत आहेत. अशावेळी नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीकडे (अजित पवार) आल्यास आ. लंके यांची द्विधा मनःस्थिती होऊ शकते. आणि ते आहे तेथेच थांबून ‘घड्याळ’ हातात बांधून नगर दक्षिणेच्या मैदानात ते किंवा त्यांच्या पत्नी राणीताई लंके या उतरू शकतात. परंतु ही सर्व राजकीय समीकरणे पुढील काही दिवसात जगजाहीर होतील.

भारतीय जनता पक्ष विद्यमान खासदारांचे तिकीट कापणार?

भारतीय जनता पक्षाकडून नेहमीच धक्कातंत्राचा वापर केला जात असल्याचा अनुभव आतापर्यंतच्या अनेक निवडणुकांमध्ये त्यांच्याच कार्यकर्त्यांना आला आहे. आता तिकीट वाटप करताना महाराष्ट्रातील १२ विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याच्या बातम्या मागील दोन दिवसांपासून विविध वृत्तवाहिन्यांवरून झळकत आहेत. या १२ खासदारांमध्ये नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पा. यांचेही नाव आहे. खा. विखे यांचे तिकीट भाजपने नाकारले तर उमेदवार कोण? हाही प्रश्न आहे. विखेंचे तिकीट कापून मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याची ‘रणनीती’ तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. कारण यापूर्वीही भाजपने या मतदारसंघातून दोनदा विद्यमान खासदारांचे तिकीट कापले होते. या दोन्ही वेळा विद्यमान खासदाराचे तिकीट नाकारून दुसरे उमेदवार दिले होते. त्यात एकदा भाजपच्या पदरी अपयश आले तर गत लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंच्या रूपाने विजय मिळवता आला होता. आता यावेळीही तिकीट कापण्याची खेळी होते की प्रसारित होणार्‍या बातम्या निरर्थक ठरतात हे अवघ्या एक-दोन दिवसात समोर येणार आहे.