रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या पिळवणुकीमुळे शेती करणे झाले अवघड

0
23

शेतकऱ्यांनी खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे मांडल्या निवेदनाद्वारे व्यथा

नगर – इंग्रज काळापासून रेल्वे लाईनच्या खालून पाटपाणी नेण्यासाठी असलेल्या मोर्‍या बंद करत रेल्वेच्या अधिकार्‍यांकडून शेतकर्‍यांची अडवणूक आणि पिळवणूक सुरु असून शेतकर्‍यांना शेती करणे अवघड झाले आहे. केंद्र सरकार स्तरावर हा प्रश्न मांडून शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शिष्टमंडळाने खा.डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेवून निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी माजी मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिलेही उपस्थित होते. या संदर्भात सारोळा कासार (ता. नगर) येथील शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, सारोळा कासार परिसरातून इंग्रज काळात रेल्वे लाईन गेलेली आहे. ज्या वेळेस रेल्वे लाईनचे काम झाले त्यावेळी रेल्वे प्रशासनाने ए, बी, सी लास अशा तिन प्रकारामध्ये जमिन अधिग्रहन करुन ठेवलेली आहे. ज्या वेळी रेल्वे लाईन झाली त्यावेळेस सर्व शेतकर्‍यांच्या एका जमिनीचे दोन भाग झालेले आहेत. त्यामुळे एका जमिनीच्या एका भागातून दुसर्‍या भागात पाटपाणी नेण्यासाठी मोर्‍या तयार करुन दिलेल्या आहेत. या मोर्‍या नं. ३३३ व ३३४ मधून शेतकरी वर्षानुवर्षे पाटपाणी नेत होते. परंतु गेल्या आठ दहा वर्षापासुन रेल्वे प्रशासनाने पाटपाणी किंवा पाईपलाईनने पाणी नेण्यासाठी बंदी घातलेली आहे. वास्तविक परिस्थिती अशी आहे की, शेतकर्‍यांच्या एका जमिनीचे दोन भाग रेल्वे मुळे झालेले आहेत.

इंग्रज काळापासून पाटपाणी एका मळ्यातुन दुसर्‍या मळ्यात नेण्यासाठी कधीही अडवणूक झाली नाही पण सध्याच्या अधिकार्‍यांच्या मनमानी मुळे शेतकर्‍यांची अडवणूक होत आहे. पाईपलाईन नेण्यासाठी शेतकर्‍यांकडे मोठ्या प्रमाणात आर्थिक मागणीही केली जात आहे. तसेच गुन्हे दाखल करण्याच्या धमया दिल्या जात असल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. हीच परिस्थिती सर्वच रेल्वे लाईनच्या कडेला असलेल्या शेतकर्‍यांची असून हा प्रश्न केंद्र सरकार स्तरावर मांडून शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे. याशिवाय सारोळा अस्तगाव या दोन गावांना जोडणार्‍या रस्त्यासाठी जुन्या दिंडी रस्त्यावर रेल्वे लाईन क्रॉस करण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात यावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी प्रविण काळे, गणेश काळे, सुभाष काळे, संजय धामणे, संजय काळे, श्रीरंग धामणे, मच्छिंद्र काळे, पोपट धामणे, ज्ञानदेव काळे, पांडुरंग काळे, अविनाश धामणे, मोहन काळे, संतोष काळे, बाबासाहेब धामणे, एकनाथ धामणे आदी उपस्थित होते.