महानगरपालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे लोकशाही दिन ठरतोय ‘फार्स’

0
34

आयुक्तांच्या आदेशावरही कार्यवाही होत नसल्याने जनतेची होतेय फसवणूक

नगर – सामान्य जनतेला न्याय मिळावा, त्यांच्या तक्रारी निकाली निघाव्यात या हेतूने शासनाने ‘लोकशाही दिना’ची संकल्पना अमलात आणली. मात्र प्रशासकीय अधिकारी-कर्मचार्‍यांच्या अनास्थेमुळे सामान्य जनतेला लोकशाही दिनातून न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे लोकशाही दिन हा प्रकार म्हणजे जनतेची फसवणूक करणारा ठरत असून, महापालिका आयुक्तांनी एखाद्या तक्रारीवर दिलेल्या आदेशाला त्यांच्याच कर्मचार्‍यांकडून केराची टोपली दाखवली जात आहे. त्यामुळे वारंवार तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याची तक्रार येथील नागरिक मुकुंद देवगावकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यासंदर्भात देवगावकर यांनी म्हटले आहे की, महापालिकेत आयोजित लोकशाही दिनात मी अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांसंदर्भात तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीवर आयुक्तांनी आदेशही दिले आहेत. मात्र या आदेशाची अंमलबजावणी करून कोणतीही कार्यवाही अद्यापपर्यंत झालेली नाही.

आतापर्यंत १० ते १२ लोकशाही दिनात तक्रारी करूनही कार्यवाही झालेली नाही. महापालिकेतील लोकशाही दिनात आयुक्त हे प्रमुख असतात, परंतु ऐनवेळी आयुक्तांऐवजी उपायुक्तांना प्रमुख म्हणून बसविण्यात आले. मागील लोकशाही दिनाची वेळ १२ वा. होती. यावेळी १० ते १२ या वेळेत तो घेण्यात आला. ४ मार्चचा लोकशाही दिन ११ वा.च्या आत गुंडाळण्यात आला. माझ्या तक्रारीबाबत आलेले अपयश लपविण्यासाठीच यावेळी तो गुंडाळण्यात आला. लोकशाही दिनात तक्रारदार येवो अथवा न येवो सर्व अधिकारी १२ वा. पर्यंत हॉलमध्ये असतात. मात्र ४ मार्चचा लोकशाही दिन ११ वा.च्या आत गुंडाळून प्रशासनाने आपली अनास्था दाखविली आहे. तरी याबाबत कारवाई करावी, अशी मागणी देवगावकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.