सूक्ष्मदर्शक यंत्र कसे कार्य करते?

0
61

सूक्ष्मदर्शक यंत्र कसे कार्य करते?

जीवशास्त्राचे प्रयोग दाखवताना तुम्हाला सरांनी सूक्ष्मदर्शक यंत्र दाखवले असेलच. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पाहिल्यावर पेशी किंवा इतर सूक्ष्म जीव कित्येक पटीने मोठे असलेले आपल्याला दिसतात. हे कसे होते ते आता पाहू. साधे काचेचे भिंग घ्या. त्या भिंगातून वर्तमानपत्रातील अक्षरांकडे पहा. अक्षरे मोठी झालेली दिसतात. सूक्ष्मदर्शक यंत्र याच तत्वावर काम करते. सूक्ष्मदर्शक यंत्रामध्ये भिंगे अशा प्रकारे बसविलेली असतात की, त्यांच्या एकत्रित परिणामामुळे आपल्याला वस्तू हजारो पट मोठ्या दिसतात. पेशी, सूक्ष्म जीवजंतू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. कारण त्यांचे मोजमाप मि.मी. च्या हजाराव्या भागाच्या प्रमाणात केले जाते. विषाणू तर याहूनही लहान असतात. त्यामुळे हजारोपट मोठे केल्यानंतरच हे जीव वा पेशी आपल्याला दिसू शकतात. पेशी व सूक्ष्म जीवजंतूंच्या परीक्षणामुळे रोगाची अवस्था समजते आणि व्यक्ती रोगी आहे का ते कळते. रोग बरा होतो आहे काय तेही समजते. क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग, कॉलरा, हगवण आदी रोगांमध्ये; तसेच रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, इतर कर्करोग यांतदेखील सूक्ष्मदर्शकाद्वारे केलेल्या तपासणीमुळे रोगाचे निदान होते व उपचार करण्यास मदत होते. असे हे सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे सूक्ष्म जीवांच्या अजब गुहेत प्रवेश करण्यासाठी मानवाला लाभलेला जादूचा दिवाच बनले आहे.