धर्मांतर करणाऱ्यांची सवलत बंद करा

0
48

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे समाज कल्याण विभागाला निवेदन

नगर – धर्मांतराचे पेव सध्या वाढत चाललेले असून याचा गैरफायदा घेऊन देशाला आणि पर्यायाने संविधानाला फसवण्याचे काम देखील तेवढ्याच ताकदीने होत आहे. सवलत ही संविधानाने चांगल्या हेतुने पुढे आणली होती पण अशा धर्मांतराच्या प्रकारांच्या मागे फसवणूक होत असल्याचे सध्याचे चित्र आहे. हिंदू धर्मातील मागासवर्गीय आिंण वनवासी बांधवांना अनेक खोटी आमीषे दाखवून कपट कारस्थाने करून भोळ्याभाबड्या लोकांचे चालाकीने धर्मांतरण केले जात आहे. हिंदू मागासवर्गीय बांधवांमधील अनेक जातींना वेगवेगळ्या श्रेणीमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक आरक्षणातून सवलत मिळत असते पण ज्या धर्मपंथांना कोणतीही सवलत नाही, अशा धर्मपंथांमध्ये हिंदू मागासवर्गीय समाजातून मुस्लिम किंवा ख्रिश्चनांमध्ये धर्मांतर करून पूर्वी सुरू असलेल्या सवलती तशाच पुढे चालू राहतात आणि या सवलती उपभोगायच्या म्हणजे सवलतीसाठी रांगेत असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. याबाबत विधानसभेत मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला होता बनवासी भागातील हिंदूंनी धर्मांतर केले तरी अशा २५० विद्यार्थ्यांना पूर्वीची सवलत लागू होती, ती सवलत धर्मांतर केल्यानंतर ही सुरूच होती. अशा प्रकारची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत.

कोणाला धर्मांतर करायचे हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण त्यासाठी संविधानाचा गैरवापर होता कामा नये. एवढीच धमक असते तर धर्म सोडला तशी सवलत सोडण्याचे धाडस देखील ठेवून दाखविले पाहिजे. कोणा खर्‍या गरजू विद्यार्थ्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही आपण तात्काळ जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयातून याबाबत अहवाल मागवावा आणि असे विद्यार्थी आढळल्यास त्यांना मिळणार्‍या सवलती बंद करून खर्‍या गरजू विद्यार्थ्यांना त्या सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी मनविसेनेच्या वतीने समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुमित वर्मा, जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड, संकेत जरे, प्रविण गायकवाड, ऋषिकेश जंगम, राहुल वर्मा, स्वप्नील पिटाला आदी उपस्थित होते.