जेनेटीक मॅपिंग म्हणजे काय?

0
99

जेनेटीक मॅपिंग म्हणजे काय?

माणसाच्या प्रत्येक पेशीत ४६ रंगसूत्रे असतात. ही रंगसूत्रे २३ जोड्यांच्या स्वरूपात असतात. यापैकी २२ जोड्या शरीरसूत्रांच्या, तर १ जोडी लिंगसूत्राची असते. व्यक्तीची शारीरिक ठेवण, डोळ्यांच्या रंग, केसांचा रंग, केसांचा प्रकार, त्वचेचा रंग, उंची, लिंग या सर्व बाबी रंगसूत्रांवर अवलंबून असतात. रंगसूत्रामध्ये वा जनुका असतात. या जनुकांवर एकेक गुणधर्म अवलंबून असतो. काही आजार जनुकात झालेल्या बिघाडामुळे निर्माण होतात असे शास्त्रीय अभ्यासातून सिद्ध झाले आहे. या जनुका जर बदलता आल्या, तर ते आजार टाळता येतील. त्यासाठी माणसात आढळून येणार्‍या सर्व रंगसूत्रांचा, जनुकांचा शोध घेऊन त्यांची रचना लक्षात येणे आवश्यक होते. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या देशांनी म्हणूनच युनेस्कोबरोबर एकत्रितपणे ह्यूमन जिनोम प्रोजेट सुरू केला होता. याची परिणती मानवी जनुकीय संरचना पूर्णपणे ज्ञात होण्यात झाली आहे. जनुकांची रचना माहीत करण्याची पद्धत म्हणजे जेनेटीक मॅपिंग होय. जेनेटीक मॅपिंग करण्यासाठी संबंधित व्यक्तीचे रक्त वा उतीद्रव्य घेण्यात येतात. प्रयोगशाळेत विविध प्रक्रिया करून शास्त्रज्ञ त्यातून डीएनए हा रंगसूत्रांतील मूलभूत घटक वेगळा करतात. या डीएनएवरील न्युलिओसाईड्सच्या विविध संरचनांचा अभ्यास करून कोणता रोग होण्याची शयता आहे याचे विश्लेषण केले जाते. भविष्यात अशा रोगग्रस्त जनुकांची दुरुस्ती किंवा त्यात बदल घडवून आणण्यात येऊ शकतील आणि जगातील अनेक रोग टाळता येतील किंवा बरे करता येतील अशी आशा निर्माण झाली आहे.