२८१ बुथवर लसीकरण; ४ ते ८ मार्च यादरम्यान घरोघरी भेटी जावूनही राहिलेल्या बालकांना देणार लस : महापालिकेची माहिती
नगर – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवारी (दि.३) नगर शहरातील २८१ पल्स पोलिओ बूथवर लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. यात मनपाच्या आरोग्य केंद्रांचा ही समावेश आहे. तसेच ४ मार्च ते ८ मार्च यादरम्यान घरोघरी भेटी देऊन पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना पोलिओची लस दिली जाणार आहे. शहरातील ४५ हजार ४९५ बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट आरोग्य केंद्रांना देण्यात आले आहे. मनपाच्या वतीने ६० हजार लसींची मागणी करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी दिली. नगर शहरात बाळासाहेब देशपांडे रुग्णालयासह माळीवाडा येथील महात्मा फुले, बुरुडगाव रस्ता परिसरातील जिजामाता, तोफखाना, सावेडी, केडगाव, नागापूर, मुकुंदनगर या महापालिकेच्या सात आरोग्य केंद्रांवर व कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल अशा ८ ठिकाणी, तसेच या केंद्रांच्या अंतर्गत २८१ ठिकाणी पोलिओ बूथ उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी ५६२ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
त्यानंतर घरोघरी भेटी देऊन लसीकरण करण्यासाठी १५५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. शहरातील बसस्थानके, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी महापालिकेकडून ट्रांझीट बूथ उभारण्यात येणार आहेत. रात्रीच्या वेळी फूटपाथवर वास्तव्य करणार्या बेघर कुटुंबातील बालकांना लस देण्यासाठी नाईट पथक नियुक्त करण्यात आले आहे. तसेच, शहरात बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी, धार्मिक स्थळे, उद्याने, तात्पुरत्या वसाहती, झोपड्या आदी विविध ठिकाणी लसीकरणासाठी मोबाईल टीम नियुक्त करण्यात येणार आहेत. शहरात पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना १०० टक्के पोलिओ लसीकरण होण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न आहेत. नागरिकांनी आपल्या पाच वर्षांपर्यंतच्या बालकाला पोलिओ डोस द्यावा असे आवाहन प्रशासक जावळे यांनी केले आहे.