फोर्टीफाइड तांदुळ विद्यार्थ्यांना आरोग्यवर्धक, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त

0
26

प्रबंधक ए.आर फलके यांची माहिती; प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत जनजागृतीपर कार्यक्रम

नगर – फोर्टीफाइड तांदुळ हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असून लोहाची कमतरता, अशक्तपणा यासाठी हा तांदुळ उपयुक्त असून रोगप्रतिकारक शक्ती वाढते, अशी माहिती भारतीय अन्न महामंडळाचे प्रबंधक ए. आर. फलके यांनी येथे दिली. भारतीय अन्न महामंडळाच्या वतीने भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुलमध्ये विद्यार्थी व शिक्षकांमध्ये फोर्टीफाइड तांदुळ वापराबाबत जनजागृती करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी शाळांना फोर्टीफाइड दर्जाचा तांदुळ वितरीत करण्यात येत आहे. याबाबत जनजागृतीपर कार्यक्रमात श्री.फलके यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी (पीएम पोषण) रमेश कासार, गुणनियंत्रण कार्यालयाचे समीर देशमुख, जिल्हा परिषद लिपिक महेश थोरात, डाटा एन्ट्री ऑपरेटर ज्ञानेश्वर कुटे, मुख्याध्यापक यु.पी. दुगड, पर्यवेक्षक बाबर आदी उपस्थित होते. श्री.फलके म्हणाले की, फोर्टीफाइड तांदुळ हा शिजवितांना किमान ३० मिनिटे पाण्यामध्ये भिजत ठेवावा. त्यांनतर तो शिजविण्यासाठी वापरावा जेणेकरुन तांदुळ चांगल्या पध्दतीने शिजतो व त्याची चव वाढते. हा तांदुळ वजनाने हलका असल्याने तो पाण्यावर तरंगतो त्यामुळे तो प्लास्टिक किंवा भेसळयुक्त नाही. या तांदुळामध्ये आर्यन, फॉलीक अ‍ॅसीड, व्हिटॉमिन बी -१२ घटक एकत्रित केलेले आहे. त्यामुळे हा तांदुळ विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी गरजेचा आहे. फोर्टीफाइड तांदुळाबाबत यावेळी विद्यार्थी व पालकांना श्री.फलके यांनी महत्त्व पटवून दिले. तसेच स्वयंपाकगृहामध्ये तांदुळ कशा पध्दतीने साठवून ठेवण्यात यावा याबाबत प्रत्यक्ष पाहणी करुन मार्गदर्शन केले. श्री. कासार यांनी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे विद्यार्थ्यांना पटवून देवून, विद्यार्थ्यांना शाळेत असतांना पोषण आहारचा लाभ घेणेबाबत प्रोत्साहित केले. यावेळी जिल्हास्तरावर योजनेचे काम पहाणारे कर्मचारी, विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.