निवडणूक रद्द करण्यासाठी सहकार न्यायालयात दावा; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासह नवनिर्वाचित संचालकांना ११ मार्चला हजर राहण्याचे समन्स
नगर – भिंगार अर्बन को. ऑप बँकेची संचालक मंडळासाठी सन २०२३ २०२४ ते २०२८-२०२९ या पाच वर्षाकरीता नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीची संपुर्ण प्रक्रिया ही बेकायदेशीरपणे राबविण्यात आलेली असल्यामुळे शुभम सतिष झोडगे, मुकेश रमेश झोडगे, अनिकेत विजय रासकर, शारदाताई गोपाळराव झोडगे, रमेश रंगनाथ कडुस यांनी अहमदनगर येथील सहकार न्यायालयामध्ये अॅड. गोरक्ष पालवे यांच्या मार्फत दावा दाखल करत सदरची निवडणुक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यावर सहकार न्यायालयाने सर्व नवनिर्वाचीत संचालक व निवडणूक निर्णय अधिकारी तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ११ मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावण्याचे आदेश पारीत केल्यांची माहिती मुकेश झोडगे यांनी दिली आहे. अहमदनगर शहारासह जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या व स्वर्गीय गोपाळराव झोडगे यांनी नावारुपास आणलेल्या भिंगार अर्बन को. ऑप. बँकेची संचालक मंडळाची सन २०२३ ते २०२८- २०२९ या पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी नुकतीच निवडणुक प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या अधिपत्याखाली पार पडली. सदरील निवडणुकीमध्ये निवडणुक निर्णय अधिकारी यांनी निवडणुक नियमाचे पालन न करता, आदर्श आचार सहिंतेची अंमलबजावणी न करता, पक्षपाती पणाने काम करुन निवडणुक प्रक्रिया पार पाडल्याचा आरोप दाव्यामध्ये करण्यात आलेला आहे. सदरील निवडणुक प्रक्रियेमध्ये मयत मतदाराचे बोगस मतदान करण्यात आल्याचे पुरावे देखील न्यायालयात सादर करण्यात आलेले आहेत. सदर निवडणुक निर्णय घोषीत करतांना नमुना इ-१६ प्रमाणे गुणपत्रक निवडणुक निर्णय अधिकारी यांनी सर्व उमेदवारांना दिलेले होते.
या गुणपत्रकामध्ये मतदान केलेल्या मतदानाचा बेरजेचा कोणताही ताळमेळ बसत नसुन सदरच्या बेरजा या पुर्णपणे चुकीच्या आहेत यावरुन सदर निवडणुक ही पुर्णत: पक्षपातीपणाने बेकायदेशीर, चुकीच्या पध्दतीने झाली असुन मतमोजणीचे मतदान केंद्र हे निवडणुकीतील हितसंबंधीत उमेदवाराच्या ताब्यातील होते. त्यामध्ये मोठी हेराफेर झाल्याची शयता असल्यामुळे केंद्र अध्यक्षाच्या सह्या विसंगत आहेत. निवडणुक मतपेट्या ठेवण्यात आलेल्या परिसरात भारत निवडणुक आयोगाच्या नियमाप्रमाणे सिल करण्यात आलेले नव्हते. तसेच सहाय्यक निवडणुक अधिकारी म्हणुन अल्ताफ शेख यांनी ते स्थानिक असल्यामुळे हेतुपूर्वक पक्षपातीपणा केल्याबाबत दाव्यामध्ये आरोप करण्यात आलेले आहे. असे अनेक कायदेशीर बाबी उपस्थित करुन सदरची निवडणुक प्रक्रिया न्यायालयात आव्हाणीत करण्यात आलेली आहे.. न्यायालयाने सदर याचिकेवरुन निवडणुकीमधील सर्व उमेदवार व नवनिर्वाचीत संचालक, निवडणुक निर्णय अधिकारी व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांना हजर होण्याबाबत आदेशीत केलेले आहे.