सवलतीत एस टी बसने प्रवास महिलांसाठी ठरतोयं ’महागडा’

0
46

बसमध्ये चढताना, प्रवासात दागिने व पैसे चोरीला जाण्याचे प्रकार वाढले; बंदोबस्त वाढवावा

नगर – राज्य शासनाने महिलांसाठी एस.टी. बस प्रवासासाठी तिकीट दरात ५० टक्के सवलत जाहीर केल्या पासून एस.टी. बसने प्रवास करणार्‍या महिलांची संख्या वाढली आहे. तसेच प्रवासादरम्यान महिलांचे दागिने, पैसे, मोबाईल चोरीला जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सवलतीत एस.टी. बसने प्रवास करणार्‍या महिलांसाठी हा प्रवास महागडा ठरत आहे. महिलांनी प्रवासात सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अन्यथा पै – पै करून जमविलेल्या पैशातून खरेदी केलेले दागिने चोरीला जाण्याचा धोका आहे. नगर शहर हे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट आणि विदर्भ मराठवाड्याला जोडणारे मध्यवर्ती ठिकाण असल्याने शहरातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रवाशांची जुन्या बसस्थानकात तर परजिल्ह्यात जाणार्‍या प्रवाशांची पुणे बसस्थानकात दररोज मोठी गर्दी होत असते. यात विशेषतः महिलांना एस.टी. बस प्रवाशी भाड्यात राज्य सरकारने सवलत जाहीर केलेली असल्याने एस टी बस प्रवासासाठी महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणावर आहे.

महिलांची गर्दी वाढण्याबरोबरच या गर्दीत बसमध्ये चढताना, उतरताना महिलांच्या गळ्यातील दागिने, पर्स मधील दागिने, पैसे चोरी जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. चोरटे गर्दीत मिसळून हातसफाई करत आहेत. गेल्या काही दिवसांत या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याने नगरमधील बसस्थानके चोरट्यांचे अड्डे बनले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत नगर शहरातील तिन्ही बसस्थानके तसेच जिल्ह्यातील इतर बसस्थानकात अशा चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. त्याबाबत विविध पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले आहेत. मात्र या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. काही बोटावर मोजणारे गुन्हे उघड झाले असले तरी दाखल गुन्ह्यांचे प्रमाण आणि उघडकीस आलेले गुन्हे यात मोठी तफावत आहे. त्यामुळे आता महिलांना पोलिसांच्या भरवश्यावर न राहता प्रवासा दरम्यान आपले दागिने, पैसे, मोबाईल व इतर मौल्यवान ऐवज जपावा लागणार आहे. तशी खबरदारी घेणेही आवश्यक आहे.