मनपाच्या शॉपिंग सेंटर गाळेधारकांकडून घटनाबाह्य अवाजवी भाडे वाढ आकारणी

0
61

अवाजवी भाडे आकारणी कमी करावी : वसंत लोढा यांचे आयुक्तांना निवेदन

नगर – महानगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरच्या गाळे धारकांकडुन घटनाबाह्य अवाजवी भाडेवाढ आकारणी झालेली असून, सदर आकारणी कमी करावी, तसेच गाळेधारकांचे मालक महानगरपालिका असल्याने घरपट्टी व इतर कर घेऊ नये, गाळेधारकांना रेडीरेकनरनुसार दरआकारणी करू नये, पक्के बांधकाम असलेले गाळे तसेच पत्र्याची शेड व टपर्‍या असलेल्या गाळ्यांचे वर्गीकरण करून दर ठरवावे, २०१६-१७ ला जे भाडे रु.९९० होते त्या गाळेचे भाडे ५४८८ रु.करण्यात आलेले आहे. यात मोठी तफावत असून ती कमी करण्यात यावी. गंजबाजार शॉपिंग सेंटर जुने दर २८९ रु. होते ते ३०००० पर्यंत वाढवण्यात आले आहेत. तसेच सदर गाळे १०० वर्षापुर्वीचे आहेत. २०/७/२०१८ रोजी झालेल्या महासभेत प्रस्ताव क्र.३ (प्रस्तावाचा विषय-गाळे धारकांचे भाडे कमी-करून मिळणे बाबत) सविस्तर चर्चा होऊन झालेल्या निर्णयाप्रमाणे अद्यापही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या बाबतीत सहानभुतीने विचार करून अवाजवी अन्यायकारक भाडेवाढ थांबवावी. सदर गाळेधारकांच्या वतीने प्रशासकांनी फेर प्रस्ताव करून शासनाकडे मान्यतेसाठी पाठवावा, अशी मागणी महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे करण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरच्या गाळे भाडेवाढीबाबत गाळेधारकांनी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेत लोढा, राजेंद्र नगरकर, अनिल सबलोक, चेतन गांधी, देशमुख सराफ, अमृत मुथ्था, चेतन गांधी, राजेंद्र धावडे, अनिल जग्गी, मनोज देवळालीकर, दिलीप मुथ्था, नीरज राठोड, सय्यद यसुफ, सय्यद सुफियान, संजय धुप्पड, शाकीर सय्यद, गोविंद राठोड, सुहास पाथरकर, बाळासाहेब खताडे, नासिर शेख आदींनी भाग घेतला. वसंत लोढा म्हणाले, सुमारे १२५ च्या वर गाळेधारक उपस्थित होते. अवाजवी भाडे आकारणी कमी करावी ही आमची प्रमुख मागणी आहे ती मान्य झाल्यास त्वरित गाळेधारक भाडे भरतील. रेडीरेकनर, शासन परिपत्रक थांबवावे व योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली. आयुक्तांनी सर्वांचे मत ऐकून घेतले. आयुक्त म्हणाले शासनाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे व नियमाने भाडे आकारणी करण्याचा प्रयत्न करू. यावेळी उपायुक्त सचिन बांगर याना फेरसर्व्हे करून आकारणीचा प्रस्ताव ताबोडतोब देण्याचे आदेश दिले आहेत. ७ मार्चपर्यंत निर्णय घेऊ असे ते म्हणाले. योग्य आकारणी झाली तर ४ दिवसात १० कोटींचा कर गाळेधारक जमा करतील, असे गाळेधारकांनी यावेळी सांगितले.