नगर शहरातील नोकरदाराची २४ लाख रुपयांची फसवणूक

0
97

 

नगर – शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवून जादा परतावा मिळण्याचे आमिष नगरच्या एका नोकरदाराला चांगलेच महागात पडले आहे. शेअर मार्केट ट्रेडिंगमधून चांगल्या आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून शहरातील एका व्यक्तीला तब्बल २४ लाख २५ हजार रुपयांना फसविण्यात आले आहे. या प्रकरणी नगरच्या सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजतसिंग राजपूत नावाच्या सायबर भामट्याने नगर मधील एका ४० वर्षीय नोकरदारास काही दिवसांपूर्वी व्हॉटसपवर एका ग्रुपमध्ये ड केले होते. त्यावर शेअर मार्केट ट्रेडिंगविषयी अधिकृत वाटेल अशी माहिती दिली जात होती. शेअर ट्रेडिंगमध्ये आर्थिक गुंतवणूक केल्यास मोठा परताव्याचे आमिष या नोकरदाराला दाखवण्यात आले होते. संबंधित भामट्याने त्या नोकरदाराला तुम्ही जेवढे पैसे गुंतवाल काही दिवसांत त्याचे दुप्पट पैसे मिळतील अशी स्कीम सांगितली. आम्हीही असेच पैसे गुंतविले आहेत. त्याचा आम्हाला इतया रुपयांचा फायदा झाला आहे. हे खात्रीशीर आहे. बिनधास्त पैसे टाका अन् कमवा, असे मेसेज त्याला करण्यात आले. यामुळे फिर्यादी नोकरदाराने सायबर भामट्यावर विश्वास टाकला आणि त्या स्कीममध्ये पैसे गुंतवले. ६ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या एक महिन्याच्या कालावधीत त्यांनी तब्बल २४ लाख २५ हजार रुपये ऑनलाईन रजतसिंग राजपूत नावाच्या भामट्याला पाठविले. त्यानंतर त्याचा संपर्क बंद झाला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सोमवारी (दि.२६) सायंकाळी नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी रजतसिंग राजपूत या नावाच्या सायबर भामट्यांविरोधात भा.दं. वि. कलम ४१९, ४२० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर हे करीत आहेत.