नगर – ‘महासंस्कृती महोत्सव, कृषी व बचतगट महोत्सवय्२०२४’च्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होण्यास मोठी मदत झाली आहे. बचतगटांना विशेषतः अशा उपक्रमांमुळे त्यांनी उत्पादित केलेल्या मालास, वस्तुस हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. गावरान मेवाचा आनंद या ठिकाणी अनेकजण लुटत आहेत. महासंस्कृती महोत्सव, कृषी व बचतगट महोत्सवाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरणास मोठा हातभार लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी केले. कृषी विभाग, सांस्कृतिक विभाग व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महासंस्कृती महोत्सव, कृषी व बचतगट महोत्सव-२०२४’ अंतर्गत सादर झालेल्या ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकाच्या प्रारंभी वर्षा उसगावकर बोलत होत्या. यावेळी माजी जि. प. अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, अभिनेते प्रशांत दामले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, आत्माचे प्रकल्प संचालक विलास नलगे, राजाराम गायकवाड, सोमनाथ जगताप आदी उपस्थित होते. या महोत्सवात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम, विविध प्रांतातील संस्कृतीचे अदान-प्रदान, लुप्त होत चाललेल्या संस्कृतीचे जतन व संवर्धन, स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवयांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसृष्टीचे दालन, तसेच दररोज सायंकाळी विविध मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत असून, नागरिकांचा कार्यक्रमांना प्रतिसाद मिळत आहे.
शालिनीताई विखे म्हणाल्या की, राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील उद्योजक व विशेषतः महिलांना नजरेसमोर ठेवून सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महोत्सवाचे आयोजन केले आहे. सातत्याने वर्षभरात २-३ उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. सामाजिक संस्थाही यामध्ये योगदान देत आहेत, असे सांगितले. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता बचतगटांनी तयार केलेली उत्पादने, चटपटीत अस्सल गावरान खाद्यपदार्थ, पौष्टिक तृणधान्यांपासून बनवलेले खाद्यपदार्थ, हस्तकला, मसाले खरेदीचा आनंद नगरकर घेतआहेत. नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन विविध वस्तूंची खरेदी करून ग्रामीण भागातील महिलांचा उत्साह वाढवावा, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले.