२७ फेब्रुवारी होणाऱ्या श्रीनिवास कल्याणोत्सवाची जय्यत तयारी

0
113

तिरुपती देवस्थाच्या परंपरेने होणार भगवंताचा विवाह सोहळा; नगरच्या भाविकांसाठी नि:शुल्क अतिदुर्लभ पर्वणी

नगर – २७ फेब्रुवारी रोजी नगर शहरात तिरुपती आंध्रप्रदेश येथील तिरुमला तिरुपती बालाजी देवस्थानच्या मुख्य गाभार्‍यातील श्री तिरुपती बालाजी, पद्मावती देवी व महालक्ष्मी देवीच्या मुख्य उत्सव मुर्त्यांचे आगमन नगरमध्ये होणार आहे. पुना रोडवरील शिल्पा गार्डन येथे सायंकाळी ६ वाजता श्री बालाजींचा श्रीनिवास कल्याणोत्सव (विवाह) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या वतीने जसा नित्य श्री बालाजींचा श्रीनिवास कल्याणोत्सव होतो अगदी तशाचा तसा सोहळा नगरमध्ये होणार आहे. नगरच्या भाविकांना प्रथमच भगवंताच्या विवाह सोहळ्याची अतिदुर्लभ पर्वणी या निमित्त मिळणार आहे. या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. यानिमित्ताने सुमारे २० ते २५ हजार भाविकांची येथे नि:शुल्य दर्शनाची सोय करण्यात आली आहे. ज्यांच्या जीवनात वैवाहिक अडचणी आहेत तसेच ज्यांचे विवाह जुळण्यास अडचणी येत आहेत, अशा भाविकांनी अडचणी दूर होण्यासाठी या सोहळ्यात उत्स्फूर्त सेवा करावी. तिरुमला तिरुपती देवस्थानचे सर्व उत्सव अतिशय नियोजनबद्ध व शिस्तबद्ध होत असतात. त्यामुळे नगरम ध्ये होणार्‍या श्रीनिवास कल्याणोत्सव सोहळाही अत्यंत काटेकोरपणे व वेळेत होणार आहे. सर्व भाविकांनी हा सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक व तिरुमला तिरुपती देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अधिक माहिती देताना सिए.रवींद्र कटारिया म्हणाले, दक्षिण भारतात खूप महत्व असलेला हा श्रीनिवास कल्याणोत्सव नगरमध्ये प्रथमच होत आहे. यानिमित्ताने भव्यदिव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने २७ फेब्रुवारी रोजी भगवंताच्या मुर्त्यांचे नगरमध्ये आगमन झाल्यावर दुपारी ४ वाजता बडीसाजन मंगल कार्यालय ते शिल्पा गार्डन दरम्यान शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेत आकर्षक सजवलेल्या भव्य रथात श्री तिरुपती बालाजी, पद्मावती देवी व महालक्ष्मी देवीच्या मुख्य उत्सव मुर्त्या ठेवण्यात येणार आहेत. या शाही शोभायात्रेत हत्ती, उंट, घोड्यांचा समावेश असणार आहे. तसेच ढोलपथक, लेझीम पथक, दांडिया पथक, तुलसी वृंदावन व मंगल कलश घेतलेल्या महिला आदींसह दक्षिण भारतातील पारंपरिक वाद्यवृन्दांच्या पथकाचा समावेश असणार आहे. यात मोठ्या संख्यने नागरिक व महिला सहभागी होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता देवाच्या विवाह सोहळा विधीस सुरवात होणार आहे. सुमारे दोन ते अडीच तासाचा हा धार्मिक विधी आहे. या सोहळ्याच्या पौरोहित्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानचे १५ पुजारी, ५० कर्मचारी व सुरक्षारक्षक येणार आहेत. नियोजन समितीचे संजय ताथेड म्हणाले, नगरचे पुत्र सौरभ बोरा यांच्या प्रयत्नातून व परिश्रमाने नगरमध्ये हा सोहळा होत आहे. श्री बालाजींचा श्रीनिवास कल्याणोत्सवानिमित्त सुमारे २० ते २५ हजार भाविकांची दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता येथे सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी भाविकांनी साध्या पारंपरिक वेशभूषेत यावे.

आलेल्या सर्व भाविकांना तिरुपती देवस्थानचा लाडू प्रसाद व विवाह सोहळ्या नंतर पोंगल प्रसाद मिळणार आहे. हा सोहळा सर्वांना व्यवस्थित बघता यावा यासाठी परिसरात मोठ्या एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. येणार्‍या भाविकांच्या दुचाकी व चारचाकी गाड्यांच्या पर्किंगीची सुटसुटीत व्यवस्था करण्यात आली आहे. पुना रोडवर वाहतुकीची कोंडी होवूनेये यासाठी प्रशासनाने कायनेटिक चौकापासून वाहतूक अन्य रस्त्याने वळवण्यात येणार आहे. आलेल्या भाविकांच्या चप्पल व बुटांची व्यवस्था बाहेर करण्यात येणार आहे. श्री बालाजींचा श्रीनिवास कल्याणोत्सव (विवाह) सोहळा यशस्वी होण्यासाठी ३०० सेवेकरी स्वयंसेवक, ५० सुरक्षारक्षक, ४ बंदुकधारी सुरक्षारक्षक व ३०० कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. यासाठी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, पोलीस अधिक्षक राकेश ओला, मनापा आयुक्त पंकज जावळे यांचे सहकार्य होत आहे. तसेच याठिकाणी तातडीच्या सेवेसाठी डॉटर, प्रथमोपचार व रुग्णवाहिका तसेच अग्निशमन गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी श्री बालाजींचा श्रीनिवास कल्याणोत्सव नियोजन समितीचे सुधीर मुनोत, अनिल लुंकड, किरण राका, अनिल पोखरणा, अजित बोथरा, अमित मुथा, आशिष खंडेलवाल, पियुष मुथा, अभिजीत कोठारी, महेश गुगळे व धनेश कोठारी आदि उपस्थित होते.