ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम

0
43

आंतरवालीत २१ फेब्रुवारीला होणार निर्णायक बैठक, आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार

जालना – मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत. सगेसोयर्‍याची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी हाताला असलेले सलाईन देखील काढून टाकले आहे. आता बुधवारी (दि.२१) आंतरवलीत निर्णायक बैठक होणार असून, पुढील आंदोलन जाहीर करणार असे जरांगे पाटील म्हणाले. राज्य सरकारने मंगळवारी (दि.२०) . बोलावलेल्या विशेष अधिवेशनात विधानसभेत मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. म्ुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला शिक्षण व नोकर्‍यांत १० टक्के स्वतंत्र आरक्षण देणारे हे विधेयक विधानसभेच्या पटलावर सादर केले होते. मात्र तरीही जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. जरांगे म्हणाले, करोडो मराठ्यांची मागणी आहे ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण हवे आहे. जे आरक्षण आम्हाला हवे आहे ते आम्ही मिळवणारच. सरकारने दिलेल्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ते न्यायालयात टिकेल का? हा प्रश्न आहे. त्यामुळे आमच्या हक्काचे ओबीसीमधील आरक्षण आम्हाला हवे आहे”. ”प्रत्येकवेळी भावनेच्या आहारी जाऊन आमच्या लेकरांचे वाटोळे होऊ देणार नाही. आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला मिळाले पाहिजे. हरकतीचा विषय पुढे करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा हे बरोबर नाही. आम्ही वेळ दिलाय, संयम ठेवलाय, हरकतीसाठी तुमच्याकडे यंत्रणा आहे. बुधवारी १२ वाजता आंतरवालीमध्ये निर्णायक बैठक होणार असून, आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार”, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

केवळ १५० ते २०० मराठ्यांनाच ‘वेगळे आरक्षण’ मिळणार

जरांगे म्हणाले, ”सगेसोयर्‍यांना आरक्षण मिळाले नाही तर विधिमंडळात पारित झालेल्या मराठा आरक्षण विधेयकाचा बहुतांश समाजाला कोणताही फायदा नाही. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून मराठा समाज झुंजत आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण कायद्यासाठी अधिवेशन बोलावले आहे. पण या कायद्यातंर्गत मिळालेल्या स्वतंत्र आरक्षणाचा फायदा केवळ १५० ते २०० मराठ्यांनाच मिळणार आहे”, असे ते म्हणाले.

स्वतंत्र संवर्गाचे आरक्षण नुकसान करणारे

जरांगे म्हणाले, ”दोन-तीन लोकांना मराठा समाजाचे वाट्टोळे करायचे आहे. यापूर्वी एसईबीसी प्रवर्गाचे आरक्षण लागू झाले. तेव्हा नोकरीसाठी मराठा तरुणांच्या निवडी झाल्या, पण नियुत्या झाल्या नाहीत. या पोरांच्या हातात आता पेन हवा होता, पण आज या पोरांच्या हातात आंदोलनाचे हत्यार आहे. त्यांचे वय निघून जात आहे. आताही मराठा आरक्षण टिकले नाही तर तेच होणार. त्यापेक्षा आम्हाला ओबीसीत असणारे आमचे आरक्षण द्या. ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत, त्यांना सगेसोयर्‍यांचे आरक्षण द्या”, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. तसेच स्वतंत्र संवर्गाचे आरक्षण मराठा समाजाचे नुकसान करणारे आहे. तुम्हाला दोन-तीन लोक महत्त्वाचे आहेत की ६ कोटी मराठा महत्त्वाचे आहेत, असा सवाल जरांगे-पाटील यांनी विचारला आहे.