कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी केली बनवेगिरी; एका जणाविरुद्ध नगरमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल

0
46

 

नगर – रक्त नातेसंबंधाचा पुरावा म्हणून एकाचे बनावट जात वैधता प्रमाणपत्र तयार करून ते दुसरे जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी सादर केल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात संगमनेरच्या व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविशंकर उत्तम अरगडे (रा. अरगडे मळा, कोल्हेवाडी, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या पोलीस निरीक्षक स्वाती थोरात यांनी फिर्याद दिली आहे. रविशंकर अरगडे यांनी कुणबी जाती दावा शैक्षणिक प्रकरण १४ जून २०२३ रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र समितीकडे सादर केले होते. प्रस्तुत प्रकरणात दाखल प्रराव्यांची तत्कालीन समितीने प्रथम छानणी केली असता त्यामध्ये रविशंकर अरगडे याने पुरावा म्हणून निकिता दिलीप अरगडे यांचे कुणबी जातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले होते. दरम्यान सदर प्रमाणपत्राची पडताळणी केली असता निकिता दिलीप अरगडे यांना जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित केलेले आढळून आले नाही. त्यामुळे रविशंकर याने बनावट जात वैधता प्रमाणपत्र तयार करून रक्त नातेवाईकांना जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबतचा धोरणात्मक निर्णयाचा लाभ मिळावा आणि समितीने इतर कोणतेही पुरावे सादर करण्याची आवश्यकता असणार नाही, असे गृहीत धरून जिल्हा जात पडताळणी समितीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.