महिलांना मोफत प्रवास योजनेमुळे पैसे देऊन प्रवास करणाऱ्यांना बसमध्ये मिळेना प्रवेश

0
89

तेलंगणातील राज्य परिवहन बसमधील गोंधळाचा प्रकार

नगर – अलिकडे तेलंगणानातील राज्य शासनाने महिला वर्गाला १०० टक्के मोफत प्रवासाची सवलत दिल्यामुळे प्रत्येक बस १००% टक्के महिला वर्गाने भरत असल्यामुळे पैसे देऊन प्रवास करु इच्छिणार्‍या पुरुषांना गाडीमध्ये प्रवेश करणे सुध्दा कठीण झालेले आहे त्याचप्रमाणे जेष्ठ नागरीक, अपंग व्यक्ती, आजारी रुग्णांना व विद्यार्थी वर्गाला या प्रसंगाचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. महिलांना १०० टक्के मोफत प्रवास सवलत दिल्यामुळे हा प्रसंग ओढावला असल्याची प्रतिक्रिया अ.नगर येथील पद्मशाली समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. स्वाती सिरसुल यांनी व्यक्त केले आहे. नगरमध्ये ७० ते ८० हजार पर्यंत पद्मशाली समाजाची लोकसंख्या असून यातील निम्म्यापेक्षा अधिक लोकांचा तेलगंणा राज्यातील त्यांच्या मुळ गावी व तेथे असलेल्या नातेवाईकाकडे सतत संपर्क व संबंध आहेत. लग्नकार्य, देवदर्शन, आजारपण व इतर सुख दुःखाच्या प्रसंगी येथील लोकांना तेलगंणातील हैद्राबाद, सिध्दीपेठ, सिरसिल्ला, कामारेड्डी, दुब्बाक्का, रामायणपेठ, मिठपेल्ली अशा जिल्ह्याच्या ठिकाणी भेटी दिल्या तसेच देवदर्शनासाठी यादगिरी गुट्टा, येमूलवाडा, कोमरेल्ली मल्लान्ना अशा तिर्थक्षेत्र ठिकाणी जाऊन दर्शन घेतले असता वरील सर्व प्रसंगाचे अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले.

१०० टक्के मोफत प्रवास सवलत योजना हे फक्त तेलंगणा राज्यातील महिलांसाठीच असून त्यासाठी आधारकार्ड दाखवणे सक्तीचे आहे. येथील बस स्थानकामध्ये बस येताच महिलांची प्रचंड गर्दी होताना दिसते या गर्दीमुळे पुरुष वर्ग लांबच राहुन त्यानंतर गाडीमध्ये प्रवेश करताना दिसतात. मात्र तोपर्यंत महिला वर्गाच्या गर्दीने बस पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे पुरुष, जेष्ठ नागरिक, अपंगाना व शालेय विद्यार्थी वर्गाला उभे राहुनच प्रवास करण्याचा प्रसंग पहावयास मिळाले असल्याचे सौ. सिरसुल यांनी सांगितले. कदाचित जनतेच्या मतदानाच्या लाभापोटी तेलगंणा राज्याने हा निर्णय घेतलेला असावा प्रामाणिकपणे पैसे देऊन प्रवास करु इच्छिणार्‍यांना हा अन्याय करणारा निर्णय आहे असे वाटते असे त्या म्हणाल्या. तसेच मोफत प्रवास निर्णयाच्या तुलनेने आपले महाराष्ट्र शासन व एस.टी. महामंडळाने गेल्या वर्षी महिलासठी ५० टक्के दिलेली प्रवासी सुट ही अगदी योग्य आणि सर्वांना न्याय देणारा निर्णय आहे. त्यामुळे प्रवास करण्यासाठी गरजु महिला वर्ग योग्य कारण असेल तरच प्रवास करतात त्यामुळे पुरुष प्रवाशांना व इतर जेष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी, शालेय विद्यार्थी यांना सर्वांना योग्य आसन व्यवस्था मिळेल हा निर्णय समतोल राखणारा असल्याचे सौ. सिरसुल यांनी म्हटले आहे.