निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अन्यथा ‘ईव्हीएम फोडणार’

0
98

आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात या मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षक कार्यालयाला देताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी.

नगर – आगामी लोकसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अन्यथा ईव्हीएम मशीन फोडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, कार्याध्यक्ष दानिश शेख, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष गुलामअली शेख, वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप वाघचौरे, ओबीसी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, युवक शहराध्यक्ष अमोल खरात, शहर जिल्हा सचिव विनीत पाडळे, अल्पसंख्याक आघाडीचे नईम शेख, अजीम खान, आफताब बागवान, प्रकाश भटेजा, जावेद सय्यद, आदिल शेख, हुसेन चौधरी, चिकू गायकवाड आदीं उपस्थित होते. आगामी लोकसभा, विधानसभा, महानगरपालिकाच्या सर्व निवडणुका ईव्हीएम मशीनवर होणार आहे. ईव्हीएम मशीनवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. ईव्हीएम मशीन हॅक होण्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. तरी देखील सर्वच निवडणुका ईव्हीएम मशीनवरच घेतल्या जात आहे. त्यामुळे एकच पक्ष सातत्याने सत्तेत येत आहे. ही बाब भारतीय लोकशाहीला घातक आहे. यामुळे देशात लोकशाही संपुष्टात येऊन हुकूमशाही आल्याशिवाय राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणुकीच्या मतमोजणीत ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यांची केवळ १ टक्के मतांची तुलना करून निष्पक्ष, पारदर्शक निवडणूक प्रक्रिया पार पडू शकत नाही. दोन्हींची शंभर टक्के तुलना होणे आवश्यक आहे. निवडणूक काळात झालेल्या घोटाळ्यामुळे ईव्हीएम मशीन वरील जनतेचा विश्वास संपत चालला आहे. देशातील अनेक राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी ईव्हीएम मशीनवर अविश्वास दाखवलेला आहे. विरोधातील तक्रारीवर निवडणूक आयोग संवेदनशीलता दाखवून दखल घेत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणात निवडणूक आयोग देखील सत्ताधार्‍यांना साथ देत असून, या घोटाळ्यामुळे देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे चालली असल्याचा आरोप रिपाईच्या वतीने करण्यात आला आहे. तर ईव्हीएम मशीनवर बंदी घालून आगामी लोकसभा निवडणुका सर्व बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करण्यात आली आहे.