हद्दपारीच्या आदेशाचा भंग करणाऱ्या गुंडांची नगर जिल्हयात पोलिसांकडून धरपकड सुरु

0
71

एलसीबी २, कोतवाली १ व नगर तालुका पोलिसांनी एकाला पकडले

नगर – नगर जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या गुंडांकडून या हद्दपारी आदेशाचा भंग करत ते लपून छपून नगर शहर परिसरात वास्तव्य करत असल्याचे समोर आले आहे. अशा गुंडांची पोलिसांनी धरपकड सुरु केली असून या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने २, कोतवाली पोलिसांनी १ व नगर तालुका पोलिसांनी एका गुंडाला पकडले आहे. या चौघांच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोतवाली पोलिसांना गुरुवारी (दि.८) रात्री डायल ११२ वर एकाने फोन करून माहिती दिली की, तोफखाना पोलिसांनी नगर जिल्ह्यातून हद्दपार केलेला गुन्हेगार आकाश उर्फ अक्षय जिजाराम साबळे (रा. रामवाडी अहमदनगर) हा समता कॉलनी, विनायक नगर, बुरुडगाव रोड येथे आलेला आहे. ही माहिती मिळताच पो.नि. प्रताप दराडे यांनी तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत रात्रगस्त घालणारे पो.ना. अविनाश वाकचौरे व पो.कॉ. सुरज कदम यांना सदर ठिकाणी कारवाई साठी पाठविले. पोलिसांनी तातडीने तेथे जावून आरोपी आकाश साबळे यास पकडले. त्याचे विरुध्द पो.कॉ. सुरज कदम यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन भा.दं.वि.कलम १८८ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १४२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई नगर तालुका पोलिसांनी केली आहे.

जिल्ह्यातून हद्दपार केलेला गुन्हेगार दिपक मुरलीधर घायमुक्ते (रा देऊळगाव सिद्धी, ता. नगर) हा हद्दपारी आदेशाचा भंग करून शुक्रवारी (दि.९) सकाळी देऊळगाव सिद्धी येथे त्याच्या राहत्या घरी आला असल्याची माहिती स.पो.नि. प्रल्हाद गीते यांना मिळाली होती. त्यांनी कारवाई साठी पथक पाठविले या पथकाने सकाळी ६ च्या सुमारास त्याला पकडले आहे. याबाबत पो. कॉ. बाळू चव्हाण याच्या फिर्यादी वरून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोतवाली व एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २ वेगवेगळ्या कारवाया करून दोघांना पकडले आहे. कोतवाली हद्दीत बुरूडगाव रोडवर श्रीरामनगर येथे विकास दिलीप खरपुडे (वय २६) याला राहत्या घरी शुक्रवारी (दि.९) दुपारी ३.४५ च्या सुमारास पकडण्यात आले असून त्याच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिंगवे नाईक गावात हॉटेल अनिकेत समोर हद्दपार गुन्हेगार गोरख गजाबापू करांडे उर्फ काळू डॉन (रा.देहरे, ता. नगर) याला गुरुवारी (दि.८) सायंकाळी पकडण्यात आले असून त्याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.