अहमदनगर शहरातील दोन्ही प्रमुख बसस्थानके बनलीत ‘चोरट्यांचे अड्डे’

0
66

दररोज दागिने, रोकड चोरीच्या घडताहेत घटना, पोलिसांमोर तपासाचे आव्हान

नगर – शहरातील जुन्या बसस्थानकासह स्वस्तिक चौकातील पुणे बसस्थानकात गेल्या काही दिवसांमध्ये पाकीट चोरी, दागिने, पर्स, चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरटे सक्रिय झाले असताना आणि दररोज चोर्‍या करत असताना पोलिसांकडून मात्र अद्यापही तपासात निष्क्रियता दाखवली जात आहे. नगर शहर हे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट आणि विदर्भ मराठवाड्याला जोडणारे मध्यवर्ती ठिकाण असल्याने शहरातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रवाशांची जुन्या बसस्थानकात तर परजिल्ह्यात जाणार्‍या प्रवाशांची पुणे बसस्थानकात दररोज मोठी गर्दी होत असते. यात विशेषतः महिलांना एस.टी. बस प्रवाशी भाड्यात राज्य सरकारने सवलत जाहीर केलेली असल्याने एस टी बस प्रवासासाठी महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणावर आहे. महिलांची गर्दी वाढण्याबरोबरच या गर्दीत बसमध्ये चढताना, उतरताना महिलांच्या गळ्यातील दागिने, पर्समधील दागिने, पैसे चोरी जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. चोरटे गर्दीत मिसळून हातसफाई करत आहेत. गेल्या काही दिवसांत या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याने नगरमधील बसस्थानके चोरट्यांचे अड्डे बनले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

महिलेचे दागिने, रोकड चोरीची आठवडा भरातील तिसरी घटना
पुणे बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत महिलेच्या हातातील, पर्समधून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे लाखभर रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि.६) सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या आठवडाभरातील ही तिसरी घटना आहे. याबाबत सुनिता रभाजी मेहेत्रे (रा. अकोळनेर, ता.नगर) यांनी बुधवारी (दि.७) कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मेहेत्रे या बाहेरगावी जाण्यासाठी पुणे बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना तेथे झालेल्या गर्दीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे १ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरीची घटना लक्षात आल्यावर आणि बाहेरगावहून परत नगरमध्ये आल्यावर त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कोतवालीची डी.बी. बदलली पण तपासाचे काय?

कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची बदली होऊन त्यांच्या जागी प्रताप दराडे यांनी पदभार घेतलेला आहे. पदभार घेताच त्यांनी गुन्हे शोध पथकाची (डी. बी.) फेररचना केली. त्यामुळे नव्याने तयार केलेले डी.बी. पथक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना करतील, गुन्ह्यांची उकल करतील आणि गुन्हेगारांना पकडतील अशी अपेक्षा होती व आहे. मात्र गेल्या महिनाभरात बसस्थानकावर इतया चोर्‍या होवूनही पोलिसांना चोरटे सापडलेले नाहीत. उलट चोरीच्या या घटना सुरूच आहेत. त्यामुळे कोतवाली पोलिस हे बसस्थानकावरील चोरट्यांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात की काय? अशी शंका उपस्थित होत आहे. बसस्थानकावरील चोर्‍यांबरोबरच शहरात इतर ठिकाणी झालेल्या चोर्‍या, घरफोड्यांचा तपासही लागलेला नाही. त्यामुळे पो.नि. दराडे यांना आता डी.बी. पथक जोमाने कार्यरत करावे लागणार आहे.

नवे अधिकारी आले अन् यापूर्वीच्या उपाययोजना पडल्या बंद

कोतवालीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी काही महिन्यांपूर्वी बसस्थानक परिसरातील चोर्‍या रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. बसस्थानकात प्रवाशांना सावधगिरीच्या सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपक यंत्रणा बसविली होती. तसेच दोन्ही बसस्थानकात साध्या वेशात महिला व पुरुष कर्मचारी नियुक्त केले होते. या उपाययोजनांमुळे बसस्थानकातील चोर्‍यांना काहीसा आळा बसला होता. मात्र पो.नि. यादव यांची बदली झाली आणि या उपाययोजनाही बंद पडल्या आहेत. परिणामी बसस्थानकावर पुन्हा चोर्‍या वाढल्या आहेत. या चोर्‍या रोखण्यासाठी नवे पो.नि. प्रताप दराडे आता काय उपाययोजना करतात, हे पाहणे औत्सुयाच ठरणार आहे.