दिव्यांग शिक्षकांची विस्तार अधिकारी, मुख्याध्यापकपदी ‘पदोन्नती’ करावी

0
60

अन्यथा जिल्हा परिषदेसमोर धरणे धरणार – प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचा इशारा 

नगर- दिव्यांग कर्मचारी शिक्षकांचे शिक्षण विस्तार अधिकारी व मुख्याध्यापक यांचे प्रमोशन तातडीने करण्यात यावे अन्यथा जिल्हा परिषदेय्समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेने दिला आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेतील सर्वसाधारण गटातील प्राथमिक शिक्षकांचे शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांचे प्रमोशन जूनमध्येच पूर्ण केले. मात्र दिव्यांग शिक्षकांचे व कर्मचार्‍यांचे प्रमोशन केले नाही. दिव्यांग कर्मचार्‍यांनी असे कोणते पाप केले की ज्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन दिव्यांग कर्मचार्‍यांकडे दुर्लक्ष करीत आहे. सेवाज्येष्ठता यादी तयार झाल्याबरोबर लवकरच करण्यात येईल, असे सांगितले. ३ डिसेंबर २०२३ च्या जागतिक अपंग दिनाच्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या सभागृहात शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी जानेवारीमध्ये नवीन वर्षात दिव्यांग शिक्षकांचे मुख्याध्यापक व शिक्षण विस्तार अधिकारी पदाचे प्रमोशन करण्यात येईल, असे जाहीर केले. मात्र अद्यापही दिव्यांग शिक्षकांच्या प्रमोशनला मुहूर्त सापडत नाही. अपंग अधिनियम कायदा २०१६ नुसार अपंगाचे हक्क आणि अधिकार यावर यामुळे गदा आली आहे. आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालून दिव्यांग शिक्षकांचे मुख्याध्यापक व शिक्षण विस्तार अधिकारी पदाचे प्रमोशन करावे. अन्यथा आपण येत्या पंधरा दिवसात प्रमोशन न झाल्यास प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संस्थेचे जिल्हा समन्वयक राजेंद्र पोकळे, जिल्हा सचिव हमीद शेख यांनी दिला आहे.