फॉसी जॉ म्हणजे काय?

0
70

फॉसी जॉ म्हणजे काय?
तुमच्या विज्ञानाच्या पुस्तकात तुम्ही फॉसी जॉ
विषयी वाचले असेल. पिवळ्या फॉस्फरसमुळे हा रोग
होते, हेही तुम्हाला माहीत असेल. या आजाराची
थोडयात माहिती घेऊ.
आजकाल हा रोग जास्त आढळत नाही.
काडेपेट्यांच्या कारखान्यात जेव्हा पिवळ्या
फॉस्फरसचा वापर केला जायचा, तेव्हा हा रोग
जास्त आढळून यायचा. या कारखान्यात काम
करणार्‍या लोकांच्या श्वासावाटे पिवळा फॉस्फरस
त्यांच्या शरीरात जात असे. अनेक महिन्यांनंतर वा
वर्षांनंतर या व्यक्तीमध्ये फॉसी जॉ ची लक्षणे दिसून
येत. किडलेल्या दातावर पिवळ्या फॉस्फरसचा
प्रामुख्याने परिणाम होतो. सुरुवातीला दातदुखी
होते, मग जबडा सुजतो, दात सैल होतात, हिरड्या
खराब होतात व जबड्याचे हाडही रोगग्रस्त होते.
यालाच फॉसी जॉ असे म्हणतात. जबड्याच्या हाडात
पू होतो व तो काही रंध्रांतून बाहेर येऊ लागतो.
याला दुर्गंधी असते. हाडाचे आपोआप फ्रॅचरही
होऊ शकते. जबड्यातील या लक्षणाखेरीज थकवा,
रक्तक्षय व सांधेदुखीही दिसून येते. यकृतही रोगग्रस्त
होते.
हा रोग टाळण्यासाठी अशा प्रकारच्या
कारखान्यात काम करणार्‍या व्यक्तींची वारंवार
वैद्यकीय तपासणी करायला हवी. क्ष-किरण
तपासणीचाही त्यात अंतर्भाव असावा. दुसरे व
महत्त्वाचे म्हणजे पिवळ्या फॉस्फरसऐवजी दुसर्‍या
सुरक्षित अशा पदार्थांचा या कारखान्यात वापर
करावा. असा उपयोग सुरू झाल्यानेच आजकाल
आपल्याला फॉसी जॉ हा रोग क्वचितच आढळून
येतो.