लाखोंच्या संख्येत मनोज जरांगे पा यांची ‘मराठा आरक्षण पदयात्रा’ मुंबईकडे रवाना

0
30

शिवाजी महाराजांना अभिवादन; नगरमध्ये जोरदार स्वागत; रस्त्यावर दुतर्फा उसळला गर्दीचा महापूर

नगर – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेली पदयात्रा दुसर्‍या दिवशी रविवारी (दि.२१) रात्री नगर जवळील बाराबाभळी येथे मु क्कामाला थांबली होती. त्यानंतर सोमवारी (दि.२२) दुपारी यात्रेचे नगरमध्ये आगमन झाले. यावेळी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा यासाठी गर्दीचा जणू महापूर उसळला असल्याचे चित्र दिसून आले. दुपारी उशिरा केडगाव मार्गे सुप्याकडे ही पदयात्रा रवाना झाली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेली पदयात्रा रविवारी (दि.२१)म ध्यरात्री पाथर्डी रस्त्याने बाराबाभळी येथे आली. या पदयात्रेच्या रात्रीच्या मु क्कामाची व्यवस्था बाराबाभळी येथे मदरशाच्या जागेवर करण्यात आली होती. जागा उपलब्ध करून देण्यासोबतच मदरशातील साडेतीनशे विद्याथ्यारनीही सेवा दिली. याशिवाय परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले होते. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील व त्यांना साथ देणार्‍या सवारचे जामिया मुहम्मदीया मदरसा यांच्यातर्फे स्वागत करणारा फलकही लावण्यात आला होता.

महिलांची मदरशामध्येच उत्तम व्यवस्था

बाराबाभळी येथील मदरशातच मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी रात्रीचा मु क्काम केला. पदयात्रेत महिलाही सहभागी आहेत. बाहेर थंडी असल्याने मदरशातील वसतिगृहामध्ये एक हजार महिलांची झोपण्याची व्यवस्था केली गेली होती. रविवारी रात्री मराठा बांधवांनी याच मैदानावर भोजनही घेतले. मदरशातील विद्याथ्यारनी मनोभावे सेवा दिली.

मनोज जरांगे यांना कुराणची प्रत भेट

मनोज जरांगे पाटील व सर्व मराठा समाज बांधवांची अत्यंत व्यवस्थित अशी सोय मदरशामध्ये करण्यात आली होती. एकतेचा, सामाजिक एकोप्याचा संदेश यावेळी संपूर्ण राज्यात पोहोचला आहे. यावेळी मनोज जरांगे यांना मदरशाच्या विश्वस्तांनी मराठी कुराणची प्रत भेट त्यांचे स्वागत केले.

मला दगाफटका झाला तरीही तुम्ही आंदोलन चालू ठेवा : जरांगे

बाराबाभळी येथे मध्यरात्री जरांगे पाटील यांची सभा झाली. यावेळी लाखो मराठा बांधवांचा समुदाय उपस्थित होता. यावेळी बोलताना ते म्हणाले मराठे कोणाला घाबरत नाहीत, हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. तुमच्यात एकी नाही असे ते म्हणत होते. मात्र आता मराठा समाज एकवटला असून जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. सरकारने कोणताही डाव टाकला तरीही तो आता यशस्वी होऊ देणार नाही. तुमच्या आशीर्वादाच्या बळावरच मी मुंबईला चाललो असून परत येईन की नाही हे माहीत नाही. मला दगाफटका झाला तरीही तुम्ही आरक्षणाचे आंदोलन चालू ठेवा असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. ते पुढे म्हणाले, आपल्या मतांच्या जिवावर यांनी राजकारण केले. आता आरक्षण दिले नाही तर यांना सळो की पळो करून सोडा व त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. तेवीस दिवस मी उपोषण केले असल्याने सध्या माझी तब्बेत बरी नाही. माझे संपूर्ण आयुष्य मी समाजासाठी घालवणार आहे. आता आरक्षण मिळाल्याशिवाय मी माघार घेणार नाही असे ते म्हणाले.

ठिकठिकाणी अल्पोपहार, फलाहार, पाण्याची व्यवस्था

मनोज जरांगे पाटील हे नगरमध्ये दाखल होताच आ.संग्राम जगताप यांनी देखील त्यांचे स्वागत केले. त्यांच्या जंगी स्वागताची तयारी आ. जगताप यांनी केली होती. मराठा मोर्चेकरांसाठी अल्पोपहार, फलाहार, पाण्याची व्यवस्था केली. गर्दीची काळजी घेऊन शहरामध्ये ६ ठिकाणी प्रशस्त मंडप टाकले होते. स्टेटबँक चौक, चांदणी चौक, एडीसीसी बँक, अरुणोदय हॉस्पिटल, राजयोग हॉटेल, आ.जगताप यांचे कार्यालय आदी ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय अन्य समाज बांधवांनीही पदयात्रेतील सहभागी मराठा बांधवांसाठी ठिकठिकाणी अल्पोपहाराची व पाण्याची व्यवस्था केली होती. जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून जरांगे पाटील यांनी अभिवादन केले. दुपारी ३ च्या सुमारास स क्कर चौकातून केडगावच्या दिशेला ही पदयात्रा रवाना झाली. जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी नगरकरांसह गावागावातून समाजबांधव मोठ्या संख्येने नगरमध्ये आले होते. त्यामुळे संपूर्ण स्टेशन रस्ता गर्दीने फुलून गेला होता.