कारवाई करावी : नागरिकांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
नगर – रस्त्याच्या दोन्ही बाजूने बसत असलेल्या भाजीविक्रेत्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असून, अपघाताच्या घटना आणि वाद-विवादाचे प्रकार वारंवार घडत आहेत. तरी याबाबत तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना निवेदन देण्यात आले असून, त्यात म्हटले आहे की, एकवीरा चौक, पाईपलाईन रोड ते पारिजात चौक, गुलमोहर रोड या रस्त्याच्या दोन्ही बाजूने भाजीविक्रेते नियमित बसत आहेत. दोन्ही बाजूस बसणारे भाजीविक्रेते व ग्राहक आणि त्यांच्या दुचाकी वाहनांमुळे बरीच जागा व्यापली जाते. त्यामुळे रहदारीसाठी रस्त्यावर अडथळे निर्माण होत आहेत, अनेकवेळा अपघात होतात. भाजी खरेदी करण्यासाठी येणार्या महिलावर्गाचे प्रमाण अधिक असल्याने वेगवेगळ्या कारणाने अनेकदा वादविवादाचे प्रकार घडत असतात. चेन स्नॅचिंगच्या घटनाही घडत आहेत. भाजीविक्रेते आपापल्या जागेवरचा हट्ट सोडत नसल्याने त्यांच्या- त्यांच्यातही वाद होतात.
भाजीविक्रेते व स्थानिक मालमत्ताधारक यांच्यातही वाद होऊन अरेरावीची भाषा वापरली जाते. त्यामुळे या परिसरात नेहमीच आरडाओरड होते. पाकिरगची समस्याही या भागात गंभीर स्वरूपाची आहे. भाजीविक्री झाल्यानंतर टाकाऊ माल व रिकामा बारदाना, प्लॅस्टिक पिशव्या भाजीविक्रेते त्याच ठिकाणी ड्रेनेजमध्ये टाकून देतात. त्यामुळे ड्रेनेज तुंबून नरहरीनगरकडे जाणारे पाणी ड्रेनेजमधून न जाता रस्त्यावरून वाहते. या परिसरात पावसाचे पाणी नेहमीच दुकानांमध्ये आणि घरांमध्ये जाण्याचे प्रमाणही त्यामुळे वाढले आहे. याबाबत महापालिका तसेच नगरसेवकांकडे तक्रारी नोंदविलेल्या आहेत. परंतु आजपयरत कुठल्याही स्वरूपाची कारवाई झालेली नाही. तरी याबाबत तात्काळ कारवाई करून होणारा त्रास थांबवावा, अशी मागणी मनसुख वाबळे, शालिनी वाबळे, अमोल पवार, श्रीधर दारुणकर, आर्यन रेपाळे, राहुल नन्नवरे, शीतल जगदाळे यांच्यासह कोहिनूर मंगल कार्यालय, किशोरी बेकरी, सानिका ब्युटी सलून अॅण्ड स्पा, स्वराज मेडिकल, फोटोतंत्रा, श्री महालक्ष्मी पतसंस्था या व्यावसायिकांनी केली आहे.