मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
72

मन म्हणजे काय?

‘मनाचे श्लोक’, ‘मन चिंती ते वैरी न चिंती’, ‘आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना’, ‘मनमानी’ असा अनेक ठिकाणी आपण ‘मन’ या कल्पनेचा वापर करतो. मन म्हणजे काय? हा एक यक्षप्रश्नच आहे. मन हे चंचल आहे. ते वार्‍यापेक्षा अधिक वेगाने धावते. सर्व भावभावना हा मनाचाच आविष्कार आहे. कोणी मनाने निर्मळ असतो, तर कोणी दुष्ट असतो. शरीररचनाशास्त्रात मनाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, तर ते काही सापडत नाही. हृदय सापडते, मेंदू सापडतो; पण हे मन काही सापडत नाही. खरे पाहायला गेले तर, मन नावाचे कोणतेही इंद्रिय शरीरात नसते. आश्चर्य वाटले ना? नसलेल्या या इंद्रियाविषयी किती म्हणी, वाक्प्रचार सापडतील! शास्त्रज्ञांनी मनाचे शोध लावायचा खूप प्रयत्न केला, पण ते काही सापडले नाही. मेंदूच्या अभ्यासावरून हे लक्षात येते की विचार करण्याची, विश्लेषण करण्याची, कल्पनेचे साम्राज्य निर्माण करण्याची क्षमता मेंदूमध्ये असते. माणसाची बुद्धिमत्ता, त्याचे ज्ञान, त्याला असलेली माहिती, त्याच्या जाणिवा व त्याचे आचारविचार सर्वच मेंदूवर अवलंबून असते. आपण ठरावीक प्रकारे का वागतो, हे आपल्या भोवतालचे वातावरण, आपण काय शिकतो-वाचतो याच्यावर अवलंबून असते. त्यामुळे कोणी निर्मळ मनाचा असेल वा वाईट प्रवृत्तीचा असेल; हे जन्मजात वा आनुवंशिक नसून अनुभव, शिक्षण व भोवतालचे वातावरण यावरच अवलंबून असते. असे हे मन. मेंदूच्या रोगांना यामुळेच मनोविकार, मानसिक रोग अशी नावे दिली जातात.