बगळा आणि खेकडा
एका देशात एक सुंदर सरोवर होते. सरोवरात खूप मासे-खेकडे आनंदात राहत होते. त्याच सरोवराकाठी एक ढोंगी बगळाही राहत होता. सरोवरात खूप मासे असले, तरी याच्या तावडीत ते सहसा सापडत नसत. त्यामुळे बगळ्याला कधी-कधी उपास घडायचा तेव्हा बगळ्याने एक ढोंग रचले. एके दिवशी तो सरोवराच्या काठावर एका पायावर उभा राहिला. डोळे मिटले व जप करीत आहोत, असा देखावा उभा केला. हे तिथेच राहणार्या एका खेकड्याने पाहिले. तो जरा लांब उभा राहत म्हणाला, “काय बगळेदादा, आज कशाचा जप करता? शिकार करण्याचा उद्योग बंद केला की काय?” यावर बगळा म्हणाला, “अरे मित्रा, कसली शिकार आणि कसले काय? या सरोवरातील माशांवर माझे जिवापाड प्रेम आहे. मला त्यांची दया येते. बिचार्यांवर आता मोठेच संकट येणार आहे. येणारे संकट टळावे; म्हणून मी देवाची प्रार्थना करीत आहे.” “संकट येणार? कसले संकट,दादा?” “अरे, यावर्षी मोठा दुष्काळ पडणार आहे. पाऊस पडणार नाही. बारीक-मोठे तलाव, जलाशय आटून जाणार. हे सरोवर तसे उथळच आहे. फारसे खोल नाही. तेही आटून जाणार आणि माझे मित्र हे मासे फुकटच जिवाला मुकणार. बिचारे पाण्यावाचून तडफडून मरणार.” “पण दादा, हे तुम्हाला कसे समजले?” “अरे मित्रा, कालच मला गरुड महाराज भेटले. त्यांनीच देवांचा असा बेत असल्याचे सांगितले. हे ऐकून खेकडाही घाबरला. तोही पाण्यात राहत होता; माशांवर जगत होता. “पण यावर काही तरी उपाय असेलच ना, बगळेदादा?” “होय मित्रा, यावर उपार आहे.” “तो कोणता, दादा?” “अरे, या टेकडीपलीकडे एक मोठे रुंद आणि खोल सरोवर आहे. ते काही आटणार नाही. आपण सर्वांना तिथे गेले पाहिजे.” “पण दादा, हे मासे कसे काय जाणार तेथे?” “अरे, हे तर मी विसरलोच बघ. पण ही अडचण सोडवता येईल. तुम्ही म्हणत असाल, तर मीच एकेकाला तेथे सोडून येईन.” हे बोलणे चालले असता जवळ असलेल्या माशांनी हे ऐकले. येणार्या संकटाने तेही घाबरले. थोड्याच वेळात सरोवरात ही बातमी पसरली. मासे आपआपसात येणार्या संकटाबद्दल बोलू लागले, विचार करू लागले. काही मासे म्हणाले, “हा बगळा तर आपला शत्रू. पण यावेळी तो आपला तारणहारच ठरला आहे. विश्वासघात करणार्या मित्रापेक्षा उपकार करणारा शत्रू चांगला आहे. संकटात जो उपयोगी पडतो, तोच खरा मित्र. आपण यालाच शरण जाऊ आणि आपला जीव वाचवू.” असे ठरताच सर्व मासे बगळ्याभोवती गोळा झाले. जो-तो पुढे घुसू लागला. आधी मला न्या, आधी मला न्या, म्हणत सर्व मासे रेटारेटी करू लागले; ढकलाढकली करू लागले. गोंधळ माजला. तेव्हा बगळा म्हणाला, “हे बघा मित्रांनो, अशी गडबड कराल, लोटालोटी कराल, तर मी कोणालाच तिकडे पोहोचवणार नाही. जरा शिस्तीने रांग लावा. मग एकेकाला नेऊन सोडीन तिकडे. पाणी आटायला अजून बरेच दिवस आहेत, तोपर्यंत मी सर्वांनाच तिथे सोडीन. मग तर झाले?” यावर सर्व मासे रांग करून उभे राहिले. बगळा एकेका माशाला चोचीत पकडून नेऊ लागला. टेकडीआड जाताच त्याला मारून मटकावू लागला. त्याला विनासायास, काही कष्ट न करता भरपूर खायला मिळू लागले. त्याची खाण्याची चंगळच चालू झाली. अशा प्रकारे काही दिवस जाताच एके दिवशी खेकडा बगळ्याला म्हणाला, “दादा, मी तर सर्वांच्या आधी तुमच्याशी बोललो, मग सर्वांच्या पाठीमागे कशाला राहू? आज मला घेऊन चला.” बगळ्याला ही कल्पना पसंत पडली. वेगळे काही तरी खायला मिळणार, याचा त्याला आनंद झाला. आजवर त्याने खेकडा खाल्ला नव्हता. त्याच्या जिभेला पाणी सुटले. (क्रमशः)