रबर कशाचे बनवतात?
रबर म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर पहिली गोष्ट उभी राहते, ती म्हणजे खोडरबर. रबराचे चेंडू, सायकल, स्कूटर, मोटारी, ट्रस यांच्या धावाही रबरी असतात. याशिवाय बागेतून पाणी घालायला वगैरे अजूनही रबरी नळ्या वापरल्या जातात. रबराच्या झाडाचा चीक वाळवून, त्यावर काही प्रक्रिया करून आपले व्यवहारातले रबर तयार केले जाते. झाडापासून काढलेला चीक पांढरा असतो. तो वाळला की त्याला ’नैसर्गिक रबर’ असे म्हणतात. हे रबर उष्णतेने वितळते नि अतिथंडीत भेगाळते. या रबरावर चार्लस् गुडइयर या अमेरिकनाने १९ व्या शतकात काही प्रयोग करून ’व्हल्कनायझिंग’ची प्रक्रिया शोधून काढली. या प्रक्रियेतून गेलेले ’औद्योगिक रबर’ हे व्यवहारोपयोगी ठरले. दक्षिण अमेरिकेतल्या रेड इंडियन जमातींना रबराच्या झाडाची खूप पूर्वीपासून माहिती होती. अमेरिकेत प्रथम गेलेल्या युरोपियन प्रवाशांनी रबर युरोपात आणले. रेड इंडियन लोक या रबराचे गोळे चेंडू म्हणून उपयोगात आणायचे. रबराचे उपयोग वाढू लागल्यावर कृत्रिम रबराचा वापर सुरू झाला. पण पेट्रोलियम पदार्थांचे भाव वाढल्यावर कृत्रिम रबर महागले नि नैसर्गिक रबराची मागणी वाढली. ब्राझील आणि इतर द. अमेरिकन देश यांच्यापेक्षाही आज मलेशिया रबरनिर्मितीत आघाडीवर आहे. द. भारतात रबराची झाडे लावायचे प्रयोग सुरू आहेत.