अस्वाथीने बनवलं अनोखं पेन..!

0
110

पार्किन्सन झालेल्या रुग्णांचा हात थरथरतो. अशा रुग्णांना पेन हातात धरून
नीट लिहिताही येत नाही. यावर उपाय म्हणून एका तरुणीने अनोखं पेन तयार
केलं आहे. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ डिझायनिंगची विद्यार्थिनी असणार्‍या या
तरुणीने पार्किन्सन विकार झालेल्या अनेकांना नवी दिशा दाखवली आहे

 

पार्किन्सन या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना अगदी छोट्या छोट्या, रोजच्या कामांमध्येही अवलम्बित्व येते. साधी सोपी कामं करताना त्यांना मदतीची आवश्यकता भासते. या आजाराने शरीरातील नसांवर असा परिणाम होतो ज्यामुळे त्यांचा स्नायूंशी ताळमेळ राहत नाही. लहानसहान बाबींमध्ये येणारं हे अवलंबित्व या रुग्णांसाठी त्रासदायक असते. पार्किन्सनग्रस्त लोकांची हीच गरज अस्वाथी सॅथिसन हा तरुणीने जाणली. नॅशनल इस्टीट्यूट ऑफ डिझायनिंगची विद्यार्थिनी असणार्‍या या मुलीने अनोखं पेनच तयार केलं. ‘फ्लेओ’ असं या पेनाचं नाव आहे.

या शोधासाठी तिला जेम्स डायसन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या पेनामुळे थरथरणारा हात स्थिर राहतो आणि रुग्ण अगदी आरामात लिहू शकतात. तसंच चित्रंही काढू शकतात. डिझायनिंगचं क्षेत्र खूपच वेगळं असतं. डिझायनिंगच्या माध्यमातून बदल घडवण्यासाठी काहीतरी जगावेगळं करायला हवं असं नाही तर आपल्याकडच्या गुणवत्तेच्या आधारे तुम्ही पुढे जाऊ शकता. आपणच समाजातल्या एखाद्या घटकासाठी बदल घडवू शकतो. त्यांचं जगणं काही प्रमाणात का होईना पण सुसह्य करू शकतो. अस्वाथीनेही तेच केलं. या प्रकल्पासाठी विविध रुग्णालयं तसंच सार्वजनिक ठिकाणांना भेटी दिल्या.

डिझायनिंगचा प्रभावीपणे वापर करून पार्किन्सन विकार झालेल्या लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी प्रयत्न करता येईल हा विचार करून तिने हे पेन तयार केलं. या जगात जवळपास १० दशलक्ष लोक पार्किन्सन या विकाराने ग्रस्त आहेत. त्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. हात थरथरत असल्यामुळे त्यांना चेकवर सहीसुद्धा करता येत नाही. अस्वाथीला लहानपणापासूनच कला आणि हस्तकलेच्या क्षेत्रात रस होता. पण अकरावीनंतर तिने डिझायनिंगच्या क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं.

नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ डिझायनिंगमध्ये तिला प्रवेश मिळाला. तिसर्‍या वर्षाला असताना अस्वाथीने एक प्रकल्प केला होता. त्या प्रकल्पाची परिणती म्हणजे ‘फ्लेओ’ हे पेन. एनआयडीने नेहमीच विद्यार्थ्याना प्रोत्साहन दिल्याचं अस्वाथी सांगते. तिच्या या प्रकल्पाला आज तुफान यश मिळत आहे. अनेक रुग्णांना या पेनमुळे दिलासा मिळत आहे.